पार्टीसाठी पैसे दिले नाही, एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

पार्टीसाठी पैसे दिले नाही, एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

आठ जणांविरूद्ध कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

पार्टी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागावलेल्या आठ जणांनी एकाला धारदार शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नगर शहरातील टांगेगल्लीत रविवारी मध्यरात्री घडली आहे. या मारहाणीत सागर साहेबराव खरमाळे (वय- 30 रा. भूषणनगर, केडगाव) गंभीर जखमी झाले आहे.

त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्निल ऊर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे (वय- 30 रा. नालेगाव), कुमार कचरे (रा. भुतकरवाडी), आप्पा बांगर (रा. हिवरे बाजार ता. नगर), राजू नेटके ऊर्फ राजू रमैय्या दास (वय- 27 रा. बोरूडे मळा), राहुल कोकणे (रा. जाधव मळा, नगर) व इतर तीन अनोळख अशा आठ जणांविरूद्ध खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सुचना केल्या. कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सोमवारी दुपारी स्वप्निल ऊर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे व राजू नेटके या दोघांना अटक केली आहे.

फिर्यादी रविवारी मध्यरात्री टांगेगल्ली येथे असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीकडे पार्टी करण्यासाठी पैश्याची मागणी केली. फिर्यादी यांनी पार्टीसाठी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागवलेल्या आरोपींनी फिर्यादीवर धारदार शस्त्राने, लाकडी दांडक्याने हल्ला करून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या खिशामध्ये असलेली सात हजार 500 रूपयाची रक्कम आरोपींनी बळजबरीने चोरून नेली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे करत आहे.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com