
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यातील ढोरजळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यास एकाने मारहाण केल्याचा प्रकार आज दुपारी घडला. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभिम मुरलीधर पठाडे (44, रा. अमरापूर ता. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार सुरेश बडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्यादीत दिली आहे. यात म्हटले आहे की, बडे हे आज नियमीत कामकाज करत असताना दुपारी दीडच्या सुमारास तपासणी कक्षात गुटखा खाऊन पठाडे याने प्रवेश केला. त्यामुळे बोलताना अस्पष्ट ऐकू येत असल्याने आपण त्यास तोंडातील गुटखा बाहेर थुंकून ये, बोलताना अंगावर थुंकी उडत आहे, असे सांगितले.
याचा त्यास राग येवून त्याने तोंडावर मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच जिवेमारण्याची धमकी दिली. कार्यालयातील खुर्च्या फेकून टेबलावरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. यावेळी आरडाओरड झाल्याने तेथे मिटींगसाठी आलेल्या व आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी सोडवासोडवी केली. यानंतर सर्व कर्मचार्यांनी पठाडे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पठाडे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे करीत आहेत.
कर्मचार्यांकडून निषेध
पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील परीचारीका व कर्मचार्यांनी पोलीस ठाण्यात येऊन या घटनेचा निषेध केला. संबंधितावर कडक स्वरुपात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, दहिगावनेचे वैद्यकीय अधिकारी कैलास कानडे, अक्षय बांगर, संभाजी आव्हाड, विजय लांडे, परेश्वर गलांडे, शिशीर शिरसाठ, कल्याण मुटकुळे, श्रीराम चव्हाण, राणी शिरसाठ, ललिता कासोळे, सिमा मडके, मंदाकिनी घोरपडे आदींसह भाजपचे गणेश कराड व अनंता उकीर्डे उपस्थित होते.