ढवळगावला विहिरीत अनोळखी मृतदेह आढळला

ढवळगावला विहिरीत अनोळखी मृतदेह आढळला

बेलवंडी |प्रतिनिधी| Belwandi

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव नजीक शिरूर-श्रीगोंदा रोडलगत असणार्‍या एका विहिरीमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. हा खुनाचा प्रकार असून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रकार केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असल्याचे तेथील शेतकर्‍यानी पाहिला. याची खबर बेलवंडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर व्यक्ती ही अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाची असून सदरची मयत व्यक्ती पायाने अपंग असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत आहे.

मृतदेह शवविच्छेदनसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून अहवाल आल्यावर पुढील माहिती समजणार आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक कमलाकर जाधव, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीसउप निरीक्षक राजेंद्र चाटे, साह्याक फौजदार मारुती कोळपे, पोलिस काँन्स्टेबल भाऊ शिंदे, पोलीस नाईक गांगर्डे, पोलीस कॉन्स्टेबल शिपनकर, पोलीस कॉन्स्टेबल संपत गुंड, बेलवंडी पोलीस स्टेशनचे इतर पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com