धानोरे-सोनगाव पाणी योजनेसाठी 20 कोटी 36 लाखाची मान्यता- ना. तनपुरे

धानोरे-सोनगाव पाणी योजनेसाठी 20 कोटी 36 लाखाची मान्यता- ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी मतदारसंघातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत सोनगांव, धानोरे पाणीपुरवठा योजनेसाठी 20 कोटी 36 लाख 62 हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

दरम्यान, या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे रु. 20 कोटी 36 लाख 62 हजार रुपये खर्च येणार आहे. या योजनेला 16 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीने तांत्रिक मान्यता दिली होती. सोनगांव, धानोरे गावांकरीता वरदान ठरणार्‍या या पाणी योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सोनगाव-धानोरे तसेच वाड्या वस्त्यांवरील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असून या गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन काम सुरु होईल.

सोनगांव-धानोरे पाणी पुरवठा योजनेसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन तसेच मंत्रालयात बैठका घेऊन हा प्रश्न मार्गी लागला आहे.

आतापर्यंत मतदारसंघात आपल्या पाठपुराव्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी मिळालेला असून उर्वरित काही प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच प्रस्तावित योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांची लवकरच निविदा प्रक्रिया होऊन पुढील कामांना सुरूवात होईल. या नवीन पाणीयोजनेमुळे सोनगांव, धानोरे परिसरातील ग्रामस्थांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com