उपोषणकर्ते रूपनवर यांची प्रकृती खालावली, पुणे येथे हलवले

धनगर आरक्षणासाठी खंबाटकी घाटात आज चक्काजाम आंदोलन
धनगर आरक्षण
धनगर आरक्षण

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुणे- बेंगळरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाट यासह राज्यभरात विविध ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (दि.20) चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा निर्धार चौंडी येथील उपोषणकर्ते तसेच धनगर समाजाच्या नेत्यांनी घेतला आहे. दरम्यान प्रकृती खालावल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल आण्णासाहेेब रूपनवर यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुणे येथे हलवण्यात आले आहे. तर चोंडी यथील आणखी एक उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृतीही खालावली आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी या ठिकाणी मागील 14 दिवसांपासून यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनवर, भाऊसाहेब दांडगे यांच्यासह सात जणांचे उपोषण करून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने धनगर समाजातील राज्यस्तरीय नेते व कार्यकर्ते उस्फूर्तपणे चोंडी येथे येत आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी चोंडी येथे दुपारी सर्वांची बैठक झाली. यावेळी घनश्याम हाके, माजी आ. रामहरी रूपनर यांच्यासह राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. धनगड व धनगर हे दोन्हीही एकच आहे. जगाच्या पाठीवर धनगड ही कोणतीही जात अस्तित्वात नाही. मात्र, जाणीवपूर्वक समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय षडयंत्र रचले आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनामध्ये वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे, तसेच या सरकारला जाग आणण्यासाठी बुधवारी खंबाटकी घाटामध्ये राज्यभरातून सर्व धनगर समाज बांधव एकत्र येऊन त्याठिकाणी रस्तारोको आंदोलन करणार असल्याचा निर्धार मंगळवारी करण्यात आला.

दरम्यान, आज मुख्य आंदोलन सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात करण्यात येणार असून यासह राज्यभर धनगर समाज बांधवांच्यावतीने चक्काजाम करण्यात येणार असल्याचा निर्धार चोंडी येथील बैठकीत घेण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com