धनगंगा पतसंस्थेच्या अध्यक्षासह व्यवस्थापकाला दहा वर्षांची शिक्षा

संचालक मंडळ दोषी, शिपाई निर्दोष
धनगंगा पतसंस्थेच्या अध्यक्षासह व्यवस्थापकाला दहा वर्षांची शिक्षा
शिक्षा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

घुलेवाडीतील धनगंगा स्वयंसहाय्यता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत पाच वर्षांपूर्वी झालेल्या 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांच्या अपहारप्रकरणी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रंगनाथ काशिनाथ काशिद व व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे या दोघांना दोषी ठरवतांना दहा वर्ष तर उर्वरीत चौदा संचालकांना प्रत्येकी दोन वर्ष कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी सुनावली आहे. तर या प्रकरणात संस्थेच्या शिपायाची निर्दोष सुटका झाली आहे.

घुलेवाडीतील धनगंगा पतसंस्थेत सचिन बजरंग कवडे हा 2006 सालापासून व्यवस्थापक या पदावर कार्यरत होता. त्याने 30 सप्टेंबर 2009 पासून आपल्या पदाचा दुरुपयोग करुन संस्थेतील संगणक प्रणालीचा गैरवापर करीत डे बुकच्या खोट्या व दिशाभूल करणार्‍या प्रिंट काढल्यानंतर कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी रोजकीर्दीस नोंदवून संस्थेच्या ठेवीदारांच्या नावाने बोगस कर्जप्रकरणं तयार केली, बोगस पावत्या तयार करुन त्यासह कर्जरोख्यांवर बनावट सह्या करुन रोख कर्ज काढले, ठेवीदारांच्या पावत्या नावे टाकून त्याची रक्कम स्वतःच्या, आपल्या मर्जीतल्या व इतर ठेवीदारांच्या नावे जमा करुन नंतर रकमा अदा केल्या.

तसेच स्वतःच्या नावाने विनातारणी कर्ज नावे टाकून त्यास संचालक मंडळाची मंजुरी घेतली नाही. ज्या पावत्यांवर ठेवतारण कर्ज आहे अशा व इतर ठेव पावत्या ठेवीदारांच्या विरहित संगणक प्रणालीतून डे बुक प्रिंट काढल्यानंतर कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी नावे टाकला. त्यातून 31 मार्च 2017 अखेर 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांचा अपहार केला.

संस्थेचे वैधानीक लेखापरिक्षक अजय राऊत यांनी केलेल्या लेखापरिक्षणातून ही गोष्ट समोर आल्यानंतर त्यांनी याबाबत दि. 17 ऑक्टोबर 2017 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संस्थेतील पाच कर्मचार्‍यांसह 20 संचालकांविरुद्ध आर्थिक अपहार केल्याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सदर गुन्ह्यात शहर पोलिसांनी त्यातील मुख्य सूत्रधार संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याच्यासह संचालक मंडळातील तत्कालीन चेअरमन रंगनाथ काशिनाथ काशिद, व्हा. चेअरमन किरण रामदास जाधव, शांताराम मुक्ताजी राऊत, संचालक मंडळातील सदस्य सर्वश्री आनंदा लहानु पानसरे, विक्रम बाजीराव गुंजाळ, प्रवीण छबु भावसार, राजेंद्र म्हाळू गायकवाड, मच्छिंद्र कारभारी ढमाले, भिकाजी गोपीनाथ राऊत, अण्णासाहेब गंगाधर नवले, बाळासाहेब धर्माजी ढमाले, अशोक लहानु पानसरे, बाबासाहेब नाना राऊत व अलका अशोक काशिद यांना अटक केली. व्यवस्थापक कवडे वगळता उर्वरीत आरोपींची जामीनावर सुटकाही झाली होती. सदर गुन्ह्याचा प्रथम तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण परदेशी यांनी केला. मात्र सदरचा गुन्हा हा मोठ्या आर्थिक स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी आर्थिक गुन्हे शाखा नगर यांचेकडे तो वर्ग केला. आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन आरोपींविरुद्ध जिल्हा न्यायालय संगमनेर येथे दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर चालली.

सरकार पक्षातर्फे एकूण 24 साक्षीदारांच्या साक्षी जबाब घेण्यात आले. सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी जोरदार युक्तिवाद करीत अनेक पुरावे सादर केले. ते ग्राह्य धरुन न्यायालयाने संस्थेचा तत्कालीन व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याला भा.दं.वि.कलम 409 खाली 10 वर्ष कारावास, तीन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 418 खाली तीन वर्ष कारावास, तीन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 467 खाली 10 वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 468 खाली 3 वर्षांचा कारावास, पाच हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा, कलम 471 खाली 10 वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायद्याच्या कलम 3 नुसार दोन वर्षांचा कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.

संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रंगनाथ काशिनाथ काशिद यांना भा.दं.वि.कलम 409 खाली 10 वर्ष कारावास, 5 हजारांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम 467 खाली 10 वर्ष कारावास, पाच हजारांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याच्या कलम 3 नुसार दोन वर्ष कारावास, पाच हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद सुनावण्यात आली. तर उर्वरीत चौदा संचालकांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगार कायद्याच्या कलम 3 नुसार दोषी धरतांना संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी प्रत्येकी दोन वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. संस्थेचे शिपाई सोमनाथ भागाजी राऊत यांना या प्रकरणातून निर्दोष सोडण्यात आले आहे.

या प्रकरणात संचालक मंडळातील महादेव दगडू अरगडे, बेबी संजय सोनवणे, सुनंदा बाळासाहेब सातपुते, सचिन गोविंद काळे, नामदेव देवराम घोडे, जिजाबाई देवीदास पांडे यांच्यासह संस्थेचे क्लार्क सचिन सुकदेव सोनवणे, लेखनीस विनायक दामोदर कांडेकर व रोखपाल शहनाज मेहबुब सय्यद या फरार आरोपींविरुद्ध सदर खटल्याचे कामकाज त्यांना अटक केल्यानंतर होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सदर खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता अ‍ॅड बी. जी. कोल्हे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, सहाय्यक फौजदार एस. डी. सरोदे, कैलास कुर्‍हाडे, महिला पोलीस नाईक दिपाली दवंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.