धामोरी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार

उमेदवारांची चाचपणी सुरू
धामोरी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी सर्व गटांकडून सुरू असून ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी पुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सरपंचपदाची जागा ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धामोरी खुर्द मध्ये माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांना मानणारे या गावांमध्ये दोन गट आहे. परंतू गाव पातळीच्या राजकारणामध्ये दोन्ही गटातील कार्यकर्ते आपल्या सोयीच्या राजकारणानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पॅनल तयार करून निवडणूक लढवत असतात.

या गावामध्ये राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे व त्यांच्या समवेत भानुदास कल्हापुरे, भारत सोनवणे, भास्कर सोनवणे, देवराम अडसुरे, प्रदीप सोनवणे आदी कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करत आहे. मच्छिंद्र सोनवणे यांच्याबरोबर पाटील गटाचे काही कार्यकर्ते असून या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. गेल्या पाच वर्षापासून मच्छिंद्र सोनवणे यांच्या ताब्यात ग्रामपंचायत सत्ता आहे. या गटाकडून सरपंचपदासाठी सुवर्णा मच्छिंद्र सोनवणे, मथुराबाई भारत सोनवणे, अनिता प्रदीप सोनवणे, समृद्धी प्रदीप सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उद्योजक प्रदीप सोनवणे यांची पत्नी किंवा मुलगी या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

विरोधी गटाकडून खरंतर या निवडणुकीमध्ये अनिता रावसाहेब खेडेकर या ही सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. मात्र त्या कोणत्या गटाकडून उमेद्वारी करणार याबाबत दोन्ही गटांमध्ये उत्सुकता आहे. कै. धोंडीभाऊ सोनवणे यांचे सुपुत्र तनपुरे गटाचे बाबासाहेब सोनवणे तसेच पाटील गटाचे राजेश सोनवणे, दत्तात्रय सोनवणे आदी कार्यकर्ते एकत्र आले असून ते ही सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारांच्या शोधात आहेत. या गटाकडून सरपंचपदासाठी शितल नारायण सोनवणे, शारदा राजेश सोनवणे या नावाची चर्चा आहे. यामुळे धामोरी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे. सध्या उमेदवाराच्या शोधामध्ये प्रत्येक वस्तीवर गटागटाच्या बैठका सुरू झाल्या असून अनेकांनी आपण कोणत्या गटात राहायचं याबाबत मौन बाळगले आहे.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे व त्यांचे चुलत बंधू बाबासाहेब सोनवणे हे एकाच कुटुंबातील असून कै. धोंडीभाऊ सोनवणे हे हयात असताना त्यांनी आपले पुतणे मच्छिंद्र सोनवणे यांच्याकडे गाव पातळीची राजकीय सत्ता देऊन कारभार सोपवला होता. परंतू धोंडीभाऊ यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा बाबासाहेब सोनवणे यांनी आपले बंधू मच्छिंद्र सोनवणे यांच्यापासून फारकत घेऊन सोसायटीच्या निवडणुकीमध्ये वेगळा सुभा तयार करून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही कुटुंब आ.तनपुरे यांना मानणारे आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार उभा राहणार? कोण कोणाच्या बाजूला जाणार? हे चित्र 16 ऑक्टोबर नंतरच स्पष्ट होईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com