12 हजार लोकसंख्येच्या देवठाणची करोनावर यशस्वी मात

12 हजार लोकसंख्येच्या देवठाणची करोनावर यशस्वी मात

वीरगाव |वार्ताहर| Virgav

एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के आदिवासी असणार्‍या अकोले तालुक्यातील देवठाण ग्रामपंचायतने करोनावर यशस्वी मात केली आहे.गावठाण आणि लहान-मोठ्या 28 वाड्या मिळून 12 हजार लोकसंख्येच्या या गावात आज घडीला करोना रुग्णसंख्या शून्य आहे.

देवठाण ग्रामपंचायतचे सरपंच केशवराव बोडके, उपसरपंच आनंदा गिर्‍हे, ग्रामविकास अधिकारी आर. सी. धनवडे, कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे, आरोग्य सेवक जगदीश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचार्‍यांचे अविश्रांत परिश्रम यामागे आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन देवठाण ग्रामस्थांनीही गावचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

लोकसंख्या मोठी असल्याने या गावात आजपर्यंत 405 करोना रुग्ण होते. त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून बाकी उपचारानंतर सुखरुप आहेत. लोकसंख्येचा विचार करता संघटीतरित्या करोनाशी सामना केल्यानेच दहा दिवसांपासून गावात एकही करोना रुग्ण नाही. करोना कालावधीतील नियमांचे काटेकोर पालन करून सध्या गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाचे गावांतर्गत स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष असून गावठाण आणि वाड्या-वस्त्यांवरही नियमीत तणनाशक आणि औषध फवारणी सुरु असते. रोज गावात साचणारा कचराही वेळच्यावेळी घंटागाडीच्या सहाय्याने उचलला जातो. नागरिकांचे पिण्याचे पाण्याचीही दरमहिन्याला तपासणी केली जाते. गावांतर्गतच्या स्वच्छतेमुळे करोना आणि इतरही विषाणूजन्य आजारांवर यशस्वी मात केल्याने अहमदनगर जिल्ह्यात देवठाण ग्रामपंचायतीच्या तत्पर प्रशासनाची दखल घेतली गेली.

करोनावर यशस्वी मात करताना करोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर जास्त भर देण्यात आला. आदिवासींमधील लसीकरणाबाबदची नकारात्मक भावना सकारात्मक करण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती केल्याने आजपर्यंत 83 शिबीरांद्वारे 3309 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

करोना कालावधीत विलगीकरण कक्ष, नियमांचे उल्लंघन करणारांवर आर्थिक दंडात्मक कारवाई, टाळेबंदीत नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंची घरपोहच सेवा आणि गावचे आरोग्यासाठी वेळोवेळी केलेल्या आवाहनाला देवठाण नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे रेड झोनमध्ये गेलेल्या या गावात आजमितीला करोना रुग्णसंख्या शून्य असून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत. देवठाण ग्रामपंचायत प्रशासनाने राबविलेल्या मार्गदर्शक तत्वांची अहमदनगर जिल्ह्यात अंमलबजावणी झाल्यास जिल्हा देखील करोनामुक्त होण्यास मदत होईल.

करोना कालावधीत तहसीलदार सतीश थेटे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,आरोग्य अधिकारी डॉ. श्याम शेटे या सर्वांनी गावाला भेटी दिल्या. गृहभेटी करुन नागरिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कठोर अंमलबजावणीही केली.नियमांचे काटेकोर पालन करून गाव करोनामुक्त करणारे देवठाणचे नागरिकच खर्‍या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत. करोना मुक्तीसाठी लसीकरण हाच प्रभावी ईलाज असल्याने देवठाण ग्रामस्थांचे शंभर टक्के लसीकरण करुनच घेणार.

- केशवराव बोडके, सरपंच, ग्रामपंचायत देवठाण

Related Stories

No stories found.