गावकीचे राजकारणापायी देवठाणचा सभामंडप अर्धवट स्थितीत

देवठाण ग्रामस्थ करणार तहसिलसमोर उपोषण
गावकीचे राजकारणापायी देवठाणचा सभामंडप अर्धवट स्थितीत

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत असणार्‍या सभामंडपाचे काम पुर्ण करावे यासहित इतर अनेक मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील देवठाणचे ग्रामस्थ मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर पासून अकोले तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

देवठाण ग्रामस्थांनी याबाबदचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयासहित वरिष्ठ स्तरावर दिले आहे. देवठाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमदार डॉ. किरण लहामटे यांचे निधीतून दिलेला सभामंडप अर्धवट अवस्थेत पडून आहे. ग्रामपंचायत प्रशासन याबाबद स्पष्ट भुमिका घेत नसल्याने गावकीचे राजकारण या कामाच्या केंद्रस्थानी आले आहे. सभामंडप स्लॅबचा करा अथवा ड्रोनचा करा पण तो पुर्ण होऊ द्या अशी ग्रामस्थांची मागणी असून सार्वजनिक बांधकाम खात्याने हे भिजत घोंगडे ठेवू नये अशी मागणी होत आहे.

10 जानेवारी 2021 पासून ग्रामपंचायतच्या दप्तराची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करुन दोषींवर कारवाई करावी ही देखील मागणी निवेदनात आहे. देवठाण येथील जलजीवन मिशन अंतर्गत 25 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेला प्रथम मान्यता मिळाली असून कामाचा शुभारंभ झाला आहे. काठवटवाडी, काळेवाडी आणि इतर वाड्यांना पाणी मिळावे म्हणून वाढीव 5 कोटींचा पुरवणी प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला असून त्यास तात्काळ मंजुरी मिळावी. गिरेवाडी, बोडकेवाडी या भागात पाण्याच्या टाक्या बांधण्यात याव्यात. जलजीवनचे काम पावसाळ्यात सुरु झाले. रस्त्याच्या कडेने पाइपलाइन काढल्याने साईडपट्टया खराब झाल्याने अपघातांचा संभव आहे. जलजीवनच्या ठेकेदाराने यावर खडी टाकून ती दुरुस्ती करण्यात यावी.आदी मागण्या या निवेदनात आहेत.

आमरण उपोषण आंदोलन अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, माजी संचालक अशोकबाबा शेळके, माजी पंचायत समिती सदस्य सीताबाई पथवे, माजी सरपंच एकनाथ सहाणे यांचे नेतृत्वाखाली होणार आहे. या सर्वांसहित शिवाजी पाटोळे, तुळशीराम कातोरे, अजय शेळके, जालिंदर बोडके, राम सहाणे, नाथू पथवे, प्रकाश शेळके, पांडुरंग मेंगाळ, खेमा पथवे, विष्णू शेळके, मदन पथवे, हौशिराम कातोरे, महेश शेळके, प्रथमेश सहाणे, संजय दराडे, हरिदास जोरवर, शिवाजी सोनवणे आदींसहित देवठाण ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत.

निवेदनाच्या प्रती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, अहमदनगर जिल्हाधिकारी, तहसिलदार अकोले, गटविकास अधिकारी अकोले, सार्वजनिक बांधकाम खाते या सर्वांना देण्यात आलेल्या आहेत.

दरम्यानचे काळात अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी विकास चौरे, विस्तार अधिकारी आर. डी. अभंग यांची समिती नियुक्त केली आहे. देवठाण ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांचे मनमानी कारभाराची मुद्देनिहाय चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश गटविकास अधिकार्‍यांनी या समितीला दिले आहेत.सखोल चौकशीअंती दोषींवर कारवाई व्हावीत परंतु आमच्या इतरही मागण्यांसाठी आम्ही आंदोलनावर ठाम असून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करणारच.

- सुधीर शेळके, संचालक, अगस्ती साखर कारखाना.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com