देवळाली प्रवरा परिसरात संततधार पावसाने खरीप धोक्यात

देवळाली प्रवरा परिसरात संततधार पावसाने खरीप धोक्यात

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravra

सलग तिसर्‍या दिवशीही दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने खरीप हंगामातील पिकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पाऊस न थांबल्यास शेतकरी बांधवांच्या हातातून खरिपाची पिके जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सलग दोन दिवसांच्या पावसानंतर काल तिसर्‍या दिवशी शुक्रवार दि. 14 रोजी सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू झाल्या. सायंकाळपर्यंत ही परिस्थिती अशीच असल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. सारखा पाऊस सुरू असल्याने शेतात जाणार्‍या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत.

संततधार पावसाने सर्वत्र चिखल व दलदल निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असल्याने पाण्याची दुर्गंधी व मोठ्या प्रमाणात डास वाढले आहेत. याचा मानवी जिवनावर परिणाम होत आहे. सूर्यदर्शन न झाल्याने अनेक ठिकाणी गवत सडले आहे. त्याचा कुबटवास सुटला आहे.

आठ ते दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर सलग तीन दिवसांपासून रात्रंदिवस पावसाच्या सरी मागून सरी कोसळत आहेत. दिवसभर संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये शेतात काम करणारे मजूर व शेतकरी यांचे व जनावरांचे मोठे हाल होत आहेत. संततधार पावसाने बाहेर असलेल्या जनावरांखाली चिखल झाल्याने त्यांना चारा खाता येत नाही.

याचा दुधाळ जनावरांवर परिणाम झाला असून दुभती जनावरं कमी दूध देत असल्याने दूध व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांना चिखल तुडवित शेतात जाऊन भर पावसात चारा आणावा लागत आहे. पावसाने चारा भिजत असल्याने जनावरेही भिजलेल्या चार्‍याकडे तोंड फिरवित असल्याने त्यांची पोट खपाटीला गेली आहेत.

संततधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, घास आदी पिकांत पाणी साचल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांत पाणी साचल्याने अनेक ठिकाणी घास, मका, सोयाबीन व कपाशीची पिके जास्त पाण्यामुळे बाधित झाली आहेत.

करोना सुरू झाल्यापासून शेतीमालाची पुरती वाट लागली असून शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. कांद्याचा वांधा झाला असून कांद्याचे दर पडले आहेत. सततच्या पावसाने चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची? अशा आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा हवालदिल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com