देवळाली प्रवराचे योगाभवन होण्याअगोदरच वादाच्या भोवर्‍यात

देवळाली प्रवराचे योगाभवन होण्याअगोदरच वादाच्या भोवर्‍यात

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

देवळाली प्रवरा नगरपरिषदेला योगभवनसाठी खासदार निधी मधून 80 लाखाचा निधी मिळालेला आहे. परंतु सध्या हे योगभवन बांधण्यावरुन देवळाली-राहुरी फॅक्टरी असा वाद सुरु झाल्याने हे योगभवन सुरु होण्याअगोदरच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

देवळाली प्रवरामध्ये भव्य योगभवन व्हावे, यासाठी शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे सातत्याने आग्रही मागणी सुरु ठेवली होती. या मागणीला यश येऊन काही दिवसापूर्वी खासदार लोखंडे यांनी कराळे यांच्या हस्ते देवळाली प्रवरा नगरपरिषदेला योगभवनसाठी 80 लाखाचा निधी मंजूर केल्याचे पत्र दिले होते. नुकताच हा निधी नगरपरिषदेला प्राप्त झाला आहे.

व ही वास्तू कशी बांधावी? त्याबाबतचा आराखडाही पाठविण्यात आला आहे. योगभवन बांधण्यासाठी नगरपरिषदेचा फॅक्टरी परिसरात वैष्णवी चौकात असलेली 10 गुंठे जागा निश्चित करण्यात आली आहे. देवळाली व फॅक्टरी येथील नागरिकांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने हे भव्य योगाभवन या ठिकाणी बांधण्याचे निश्चित करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला.

परंतु या निर्णयाला फॅक्टरी परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. 80 लाखाचा निधी विभागून 40 लाखाचे योगभवन राहुरी फॅक्टरीसाठी बांधावे व 40 लाखाचे योगभवन देवळालीसाठी बांधावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याबाबत पालिका प्रशासनाशी चर्चा केली असता ते म्हणाले, हा खासदार निधी आहे. त्यामध्ये योगभवन कशा प्रकारे बांधावे? याचा आराखडाही पाठविलेला आहे व या योगभवनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे योगभवन असे नाव द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा निधी विभागून दोन योगभवन बांधण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही किंवा तशी मंजुरीही नाही. त्यामुळे फॅक्टरी येथील नागरिकांनी मागणी करुनही यात बदल करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याचे दाट चिन्ह दिसताहेत.

80 लाखाचे योग भवन ही भव्य वास्तू आहे. त्यासाठी जागा ही भव्यच लागणार आहे. म्हणूनच नगरपरिषदेच्या दहा गुंठे जागेत वैष्णवी चौकात ही वास्तू उभी करावी, असे ठरले आहे. ही जागा फॅक्टरीच्या नागरिकांना देखिल सोईस्कर आहे. सर्व सोयी, सुविधा उपलब्ध असे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे योगभवन सर्वासाठी उपयोगी ठरणार असून उगाच याबाबत वाद घालणे योग्य नाही. या वास्तूमुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचे शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com