देवळाली प्रवरा परिसरात भाजीपाल्याला बसली महागाईची फोडणी
सार्वमत

देवळाली प्रवरा परिसरात भाजीपाल्याला बसली महागाईची फोडणी

शेतकर्‍यांकडून कमी दराने खरेदी करून चारपट दराने भाजीपाल्याची विक्री; ग्राहकांची सर्रास लूट

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

देवळाली प्रवरा परिसरात लॉकडाऊनच्या भितीने नागरिकांनी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी केल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर चौपट केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकर्‍यांना न होता रस्त्यावर बसून व किरकोळ विक्रीचे दुकान मांडलेले विक्रेते मधल्यामध्ये आपले उखळ पांढरे करून घेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजीपाला विक्रेते सर्रास ग्राहकांची लूटमार करीत असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राहुरी शहरासह राहुरी फॅक्टरीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील काही भागातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फायदा नगरपरिषद हद्दीतील सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी उचलला आहे.

20 ते 25 रुपये किलो असणारा बटाटा काही 60 रुपये तर काही 40 ते 50 रुपये किलोने विकत आहेत. 40 रुपये किलो असणारी मिरची 80 रुपये किलो, 30 ते 35 रुपये किलोची भेंडी 60 रुपये किलो, 30 ते 40 रुपये किलोची वांगी 60 ते 70 रुपये, 30 ते 35 रुपये किलोचा टोमॅटो 80 ते 90 रुपये, 5 ते 10 रुपये असणारी पालकाची जुडी 25ते 30 रुपये, 15 ते 20 रुपये असणारी कोथिंबीर जुडी 40 ते 50 रुपये, 5 ते 10 रुपयांना असणारा कोबी गट्टा 20 रुपये, 50 ते 60 रुपये असणारा लसूण 125 ते 150 रुपये, 5 रुपयांना असणारे दुधीभोपळे 10 रुपये, 15 ते 20 रुपये किलो असणारे दोडके 40 ते 45 रुपये, 10 ते 12 रुपये किलो असणारी काकडी 25 ते 30 रुपये, 10 ते 15 रुपयांना असणारी मेथी जुडी 30 ते 40 रुपये, 40 रुपये किलो असणारी गवार 80 रुपये किलो, या प्रमाणे सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

ग्राहकांना पाऊस असल्याने भाजीपाला विक्रीस कमी येत असल्याचे कारण देऊन चढ्याभावाने सर्रास नागरिकांची लूट सुरू आहे. मात्र, आजही बाजार समितीमध्ये जाऊन प्रत्यक्ष बघितले तर शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडत नाही. शेतकर्‍यांकडून 10 ते 15 रुपये दराने खरेदी केलेली मेथी जुडी 30 ते 40 रुपये दराने विकली जात आहे. 40 रुपये किलो असणार्‍या शेवग्याच्या शेंगा 80 रुपये किलो, भुईमुगाच्या शेंगा 100 रुपये किलोने विकल्या जात आहेत. याप्रकारे मधल्यामध्ये हे दलाल पैसे कमवित आहेत.

परंतु शासन यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता कागदी घोडे नाचवित आहेत. जादा दराने विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असा फक्त फतवा काढण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, आजवर याबाबत एकही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या लोकांचे फावले जात असून त्यांचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. परंतु मोलमजूरी करून खाणारे, ज्यांचे हातावर पोट आहे, असे व सर्वसामान्य नागरिक यांच्या खिशाला यामुळे कात्री लावली जात आहे.

आधीच करोनामुळे अनेकांचा नोकरी, व्यवसाय बंद पडला आहे. पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असताना अशा प्रकारे होणारी नागरिकांची लूटमार म्हणजेच दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावे लागेल. ही सर्व लूटमार थांबविण्याचे काम शासनाचे आहे. परंतु या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला त्यांना वेळ कुठं आहे. बिचारी जनता महागाईच्या आगीत होरपळतेच आहे.

Deshdoot
www.deshdoot.com