देवळाली प्रवरात खासगी कोविड सेंटरवरून राजकीय कलगीतुरा

कोविड सेंटर म्हणजे राजकारणाचा अड्डा नव्हे- सत्यजित कदम
देवळाली प्रवरात खासगी कोविड सेंटरवरून राजकीय कलगीतुरा
File Photo

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या काकासाहेब चौकातील इमारतीमध्ये सुरु असलेले खासगी कोव्हिड सेंटर शासकीय करण्यात यावे, या मागणीने जोर धरला असून यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे एकत्र आले आहेत. खरे तर हे उशीरा सुचलेलं शहाणपणं अस म्हणलं तर वावगं होणार नाही.

खासगी कोविड सेंटर शासकीय करण्याच्या मागणीवरुन सत्ताधारी भाजपा व विरोधी महाविकास आघाडी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. मागील वर्षी कोविडची साथ सुरु झाल्यानंतर शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी काकासाहेब चौकातील इमारत भाडोत्री घेऊन तातडीने या ठिकाणी 20 ऑक्सीजन बेड सह 50 बेडचे सत्यजित कदम फाऊंडेशनच्या वतीने डेडीकेटेड कोविड सेंटर सुरु केले.

यावर्षी पुन्हा कोविडची दुसरी भयानक लाट सुरु झाल्यानंतर दोन महिन्यापूर्वी हे सेंटर शहरातील व तालुक्यातील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन सुरु केले. या सेंटरला कुठलीही शासकीय मदत नसल्याने अर्थातच हे सेंटर खासगीच झाले. या ठिकाणी उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांमध्ये व उपस्थित डॉक्टरांमध्ये बिलाबाबत वाद होऊ लागल्यानंतर हे सेंटर खासगी असल्याचे समोर आले. तोपर्यंत हे नगरपरिषदेचे सेंटर असल्याचा भ्रम नागरिकांचा होता.

दरम्यान सहारा मंगल कार्यालयात शासकीय कोविड सेंटर सुरु झाल्यानंतर तेथे मोफत उपचार सुरु झाले आणि या ठिकाणी पैसे मोजावे लागत असल्याने बाधित रुग्णांचा भ्रमाचा भोपळा फुटला आणि या बाबतच्या तक्रारी महाआघाडीच्या नेत्यांकडे जाऊ लागल्यानंतर हे सेंटर शासकीय करण्याची मागणी ऐरणीवर आली. हे सेंटर शासकीय करण्यासाठी विरोधकांनी चंग बांधला व खालपासून वरपर्यंत याबाबत पत्रव्यवहार व निवेदन देऊन हालचालींना वेग आला आहे.

शासनाने हे कोविड सेंटर सुरु करुन या ठिकाणी 50 ऑक्सीजन बेडची व्यवस्था केली तर सहारामधील 50 बेड व 50 बेड अशी 100 बेडची व्यवस्था होऊ शकते. आणि हे जरी कमी पडले तर खबरदारीची उपाययोजना म्हणून देवळाली सोसायटीचे शांताबाई कदम सांस्कृतिक भवन ताब्यात घेतले तर या ठिकाणी देखील 50 ते 60 बेड ची व्यवस्था होऊ शकते. कोविडची तिसरी लाट खूप तिव्र असल्याची वारंवारं चर्चा होत असतांना पुढील उपाययोजना म्हणून हे केल्यास भविष्यात येणार्‍या तिसर्‍या लाटेमध्ये पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे हे सेंटर शासकीय करण्याची मागणी रास्तच म्हणावी लागेल.

या ठिकाणी नगरपरिषद असली तरी या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे हे एक मोठे खेडेच आहे. या ठिकाणची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आणि कोविडच्या काळात लॉकडाऊन मुळे शेतीची पुरती वाट लागली आहे. म्हणूनच रुगणांच्या उपचारासाठी लाखात खर्च करण्याची येथील नागरिकांची तयारी नाही म्हणण्यापेक्षा ऐपत नाही हे म्हणणे जास्त योग्य आहे. म्हणूनच महाआघाडीच्या वतीने सुरु करण्यात आलेले अभियान नागरिकांच्या दृष्टीने योग्य असल्याने हे या आधीच होणे जरुरी होते. म्हणूनच हे उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणावे लागेल.

याबाबत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले, मागच्यावर्षी परिसरातील नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून व वेळेत स्थानिक मदत उपलब्ध व्हावी म्हणून येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. या मध्ये सत्यजित कदम फाऊंडेशनच्या वतीने तेथील डॉक्टरांना ऑक्सीजनपासूनची लागणारी सर्व सोय उपलब्ध करुन देणे इतकं काम फक्त फाऊंडेशनचे होते. आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वगळता इतर एकही डॉक्टर एमबीबीएस नाही. तालुका, जिल्हास्तरावरील एमडी डॉक्टर त्यावेळी हातापाया पडून आणले व सेंटर सुरु केले. त्यामुळे परिसरातील बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ऑकसीजन व्यवस्था व इतर दवापाण्याची व्यवस्था चोख ठेवल्याने रुग्ण लवकर बरे होऊन गेले. त्यावेळी देखील मी शासनाला हे सेंटर शासकीय करण्याची विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली नाही. आताही दोन महिन्यापूर्वी मी जिल्हाधिकारी यांच्याकडे हे सेंटर शासकीय करण्याची लेखी मागणी केलेली आहे. हे विरोधकांना देखील माहिती आहे. सेंटर हा काही राजकारणाचा अड्डा नाही. कुठं व कोणत्या बाबतीत राजकारण करावे याचे जरा भान विरोधकांनी ठेवावं. नागरिकांना मोफत उपचार मिळावेत ही आमची देखील मागणी आहे. लसीकरणाबाबत आम्ही नगरपरिषद मार्फत लस विकत घेण्याची तयारी दाखविली. पण शासन त्यालाही मान्यता देत नाही. जे म्हणतात इथं जादा बिल घेतले जाते. त्यांनी बाहेरच्या दवाखान्यात किती बिलं भरलेत याची माहिती माझ्याकडे आहे. रुग्णांच्या आडून जर कोणी राजकारण करत असेल तर हा किळसवाणा प्रकार असल्याचे नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com