देवळाली प्रवरा प्रा.आ. केंद्रात वयोवृद्ध रुग्णाला कर्मचार्‍याकडून मारहाण

वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची उचलबांगडी करा-कराळे
देवळाली प्रवरा प्रा.आ. केंद्रात वयोवृद्ध रुग्णाला कर्मचार्‍याकडून मारहाण

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravar

केसपेपर काढल्यानंतर दहा रुपयातून पाच रुपये परत मागणार्‍या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाला देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याने शिवीगाळ करून धक्काबुक्की करून त्याला ढकलून दिल्याने ते ज्येष्ठ नागरिक जमिनीवर पडले. हा प्रकार देवळाली प्रवरा शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे यांच्यासमक्ष घडला. याबाबत कराळे यांनी तेथेच त्या कर्मचार्‍याची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र, डॉ. विखे यांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून त्या उर्मट कर्मचार्‍याची पाठराखण केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या उर्मट कर्मचार्‍यासह आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंदाची बदली करण्याची मागणी कराळे यांनी केली आहे. उर्मट कर्मचारी येथील आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांवर दादागिरी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यांच्या बदल्या करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या दवाखान्यात शासनाकडून दरमहा मोठ्या प्रमाणात गोळ्या, औषधे दिली जातात. मात्र, थोड्याच दिवसांत औषधांचा साठा संपतो कसा? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय अधिकार्‍याचा स्वतःचा खासगी दवाखाना असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. रात्री येथील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारीही मद्यधुंद अवस्थेत असतात असे कराळे यांनी सांगितले. हे प्राथमिक आरोग्य केंद्र उपचाराचे ठिकाण की, दादागिरीचा अड्डा? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. उर्मट कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणार्‍या वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी शिवसेना शहराध्यक्ष सुनील कराळे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com