देवळाली प्रवरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

सरासरी ओलांडली; पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी
देवळाली प्रवरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

देवळाली प्रवरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा शेतकर्‍यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम यांनी दिला आहे.

देवळाली प्रवरामध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे नाले विहीरी तुडूंब झाल्या आहेत. सर्वच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे खरिपाची कपाशी, सोयाबीन, ऊस, भुईमूग, मका, घास आदी पिकांसह विविध पिके व चारा पिके पाण्याखाली गेली आहेत.

त्यामुळे ही पिके आता हातातून जाण्याची चिन्हे आहेत. कायम निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेला शेतकरी आता मेटाकुटीस आला आहे. उभ्या पिकांचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. तशी मागणी देखील परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

देवळाली प्रवरा कृषी विभागाला याबाबत विचारणा केली असता हे काम आमचे नसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. काही शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचे पीकविमा केलेले आहेत. मात्र विमा कंपनीचे कोणतेच अधिकारी या शेतकर्‍यांकडे लक्ष देत नसल्याने तेथेही कोणतीही मदत शेतकर्‍यांना मिळताना दिसत नाही.

राहुरीच्या तहसीलदारांनी याबाबत तातडीने दखल घेऊन महसूल यंत्रणेमार्फत सर्व उभ्या पिकांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचा तातडीने प्रयत्न करावा. अन्यथा शेतकर्‍यांना आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन करावे लागेल. असा इशारा कदम व शेतकरी संघटनेचे नेते संदीप खुरूद यांनी दिला आहे.

देवळाली प्रवरा परिसरामध्ये बुधवारी झालेल्या पावसाने राहुरीच्या पावसाच्या सरासरीलाही मागे टाकले आहे. राहुरी तालुक्यात एक जूनपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तालुक्यात एकूण 620 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. एकट्या देवळाली प्रवरा येथे बुधवारी 82 मिमी. विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देवळाली प्रवराने तालुक्याची सरासरी ओलांडली असून आतापर्यंत येथे 622 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शेतकरी संकटात असताना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहू कानडे हे शेतकर्‍यांकडे फिरकले देखील नाहीत, अशी खंत शेतकर्‍यांनी व्यक्त करत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या देवळाली चे कामगार तलाठी हे उपलब्ध नसले तरी तहसीलदारांनी तातडीने या ठिकाणी प्रभारी तलाठ्याची नेमणूक करून या महसूल यंत्रणेमार्फत तातडीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे।

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com