देवळाली प्रवरातील गोळीबार प्रकरणातील त्या तरूणाचा मृत्यू

देवळाली प्रवरातील गोळीबार प्रकरणातील त्या तरूणाचा मृत्यू

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे प्रेमप्रकरणातून झालेल्या गोळीबारातील जखमी तरुण

विक्रम उर्फ विकी रमेश मुसमाडे याचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

मंगळवार दि. 15 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास एका तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर व स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न येथील विक्रम मुसमाडे या युवकाने केला. या गोळीबारात ती तरुणी किरकोळ तर विक्रम मुसमाडे गंभीर जखमी झाला.

त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान गोळीबारात विक्रमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय सूत्रांनी त्याच्यावर उपचार सुरू करून 72 तासांचा अवधी दिला होता. विक्रमला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर गुरुवारी (दि.17) सायंकाळी प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी विक्रमला मृत म्हणून घोषित केले.

विक्रम याच्या मित्रांनी आपल्या व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसवर त्या तरुणीसोबत विक्रमचे असलेले फोटो व्हायरल करून हे एकतर्फी प्रेम मुळीच नव्हते असे सांगून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, शोकाकुल वातावरणात विक्रम याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून विक्रम हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, चुलते, चुलत भावंड असा मोठा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com