देवळाली प्रवरा येथे शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा

देवळाली प्रवरा येथे शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

सततचा दुष्काळ, त्यानंतरची अतिवृष्टी, रखडलेली कर्जमाफी आणि आता करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेली पाच महिने भाजीपाल्यासह शेतमालाची पुरती वाट लागल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. एकमेव आधार असणारा दूध व्यवसाय दुधाचे दर पडल्याने धोक्यात आला. या सर्व प्रश्नांवर सरकारला जाग येण्यासाठी येथील बाजारतळावरील शेतकरी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र लोंढे यांनी दिला आहे.

लोंढे यांनी सांगितले, दुर्दैवाने हा जगाचा पोशिंदाच अनेक गोष्टीपासून वंचित राहिला आहे. अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाची उरलीसुरली करोनाने वाट लावली. अनेक संकटांना तोंड देऊन आणलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव असल्याने आधीच संकटात असलेला बळीराजा आणखी संकटात सापडला आहे.

करोनाच्या लढाईत गहू, हरभरा, मका, कांदा, बाजरी व मोठ्या कष्टाने तयार केलेला भाजीपाला याला मातीमोल भाव मिळत आहे. या सर्वावर आधार म्हणून वाटत असलेली सरकारची कर्जमाफी आतापर्यंत शिवेपर्यंतच आली आहे. ती अजून गावात दाखल न झाल्याने आशाळभूतपणे त्याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.

मागील वर्षी उतरविलेल्या पीकविम्याची दमडी मिळाली नाही. ज्यांना मिळाली त्यांची देखील थट्टाच करण्यात आली. अशी रक्कम मिळाली. हे सर्व शेतकरी सहन करीत असतानाच शेतकरी कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या दूध व्यवसायाचे सरकारचे लक्ष नसल्याने वाटोळे झाले आहे. 35 रुपये लिटरचे दूध 18 रुपये लिटरवर आले.

तरी देखील राज्यकर्त्यांना याची गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटेना. सरकार फक्त घोषणाच करतंय, प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुधाचे दर स्थिर ठेवण्यासाठी दूध उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने अनुदान सुरू करावे, तरच अशा खडतर परिस्थितीमध्ये हा बळीराजा टिकेल, अन्यथा शेतीपासून दूर होत चाललेली नवीन पिढी शेतीला हात देखील लावणार नाही. म्हणूनच शेतकर्‍यांच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग येण्यासाठी तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा लोंढे यांनी इशारा दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com