सहा पोलीसदादांच्या खांद्यावर सतरा गावांची सुरक्षा
सार्वमत

सहा पोलीसदादांच्या खांद्यावर सतरा गावांची सुरक्षा

देवळाली प्रवरा स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- कराळे

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

देवळाली प्रवरा येथे मंजूर झालेले स्वतंत्र पोलीस स्टेशन लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांचे शिष्टमंडळ घेऊन भेट घेणार असून जोपर्यंत पोलीस स्टेशन सुरू होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार देवळाली प्रवरा शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे यांनी व्यक्त केला.

कराळे यांनी सांगितले, देवळाली प्रवरा हे सुमारे 50 हजार लोकसंख्या असलेले नगरपरिषद असलेले तालुक्यातील एक प्रमुख शहर आहे. या शहराच्या संरक्षणासाठी आजही एकच ब्रिटीशकालीन पोलीस चौकी आहे. या चौकीत एका पोलीस हेड कॉन्स्टेबलसह सहा पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या चौकी अंतर्गत देवळाली प्रवरासह टाकळीमिया, मुसळवाडी, लाख, जातप, करजगाव, चिंचोली, पिंपळगाव फुणगी, गुहा आदीसह 17 गावे येतात.

या सर्वगावांची सुरक्षा या 6 पोलीस कर्मचार्‍यांच्या हाती आहे. त्यातच नगर-मनमाड सारखा राष्ट्रीय महामार्ग याच चौकीच्या हद्दीत येत असल्याने महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पोलीस बंदोबस्ता साठी यातील कर्मचार्‍यांना जावे लागते. निवडणूक बंदोबस्त, शाळांचा परीक्षा बंदोबस्त, यात्रा बंदोबस्त, गणपती उत्सव, सण-उत्सवाला पोलीस बंदोबस्त ही नेहमीची कामे सुरू असतात. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे व सुरक्षेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

तसेच प्रवरा नदी जवळ असल्याने वाळू तस्करांचा वाढता सुळसुळाट, त्यातून निर्माण झालेले टोळीयुद्ध व गुन्हेगारी टोळ्या यांनी डोके वर काढल्याने मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. वाढत्या अवैध व्यवसायामुळे वाढलेली गुन्हेगारी, चोर्‍या, दरोडे, रस्तालुटीचे वाढते प्रमाण या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी सहा पोलीस कर्मचारी म्हणजे अत्यंत तोकडे पोलीसबळ आहे. एका गावासाठी एक देखील पोलीस कर्मचारी वाट्याला येत नसल्याने वरील गावांची सुरक्षा ही रामभरोसेच म्हणावी लागेल.

यासाठी देवळाली प्रवरा हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन लवकरात लवकर सुरू होणे नागरिकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी शिवसैनिकांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री व गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटणार असून वरील सर्व माहितीचे निवेदन त्यांना सादर करून करोनाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर पोलीस स्टेशन सुरू करण्याची आग्रही मागणी करणार असल्याचे कराळे यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा नंतर शिर्डी, सोनई, शनिशिंगणापूर आदी ठिकाणी जिल्ह्यात पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले. परंतु अद्याप देवळाली प्रवराचे स्वतंत्र पोलीस स्टेशनचे घोंगडे भिजत पडले आहे. मागील सरकारच्या काळात यास चालना मिळाली होती. पोलीस अधीक्षकांकडून सर्व माहिती सरकारने मागितली होती. आकृतीबंधही तयार झाला होता. जागेचाही प्रश्न सुटला होता. परंतु त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका लागल्यानंतर हा प्रश्न पुन्हा मागे पडला. सध्या करोना विषाणूचा कहर वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्ताची गरज भासत आहे. यासाठी व वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांच्या नागरी सुरक्षेसाठी पोलीस स्टेशन सुरू होणे अत्यंत जरूरी आहे. जोपर्यंत पोलीस स्टेशन सुरू होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे सुनील कराळे यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com