देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

देवळाली प्रवरासह पंचक्रोशीतील करोना रुग्णांना जवळच उपचारासाठी सहजतेने जागा उपलब्ध व्हावी

व कमी खर्चामध्ये त्यांचा उपचार व्हावा, या उद्देशाने देवळाली प्रवरा येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.

सत्यजित कदम फाउंडेशन च्या पुढाकाराने नगरपरिषदेने उभारलेल्या बाजारतळा जवळील इमारतीमध्ये कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यात आली. हे सेंटर काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी असलेल्या सुविधा भविष्यकाळाचा विचार करता तशाच ठेवण्यात आल्या होत्या.

गेली काही दिवसांपासून नगरपरिषद हद्दीत व परिसरामध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने या ठिकाणी असलेले सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती. या सेंटरचे उदघाटन चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा अगदी कमी खर्चामध्ये देण्यात यावी, अशा सूचना कदम यांनी केल्या.

यावेळी डॉ. भास्कर सिनारे, डॉ. भागवत वीर, डॉ. सचिन चौधरी, डॉ. प्रविण कोठुळे, डॉ. प्रविण पाखरे, डॉ. नितीन नेहे, गोरक्षनाथ मुसमाडे, प्रकाश संसारे, सचिन ढुस, भारत शेटे, आदींसह नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केले.

काही करोनाबाधित नागरिक होम क्वारंटाईनच्या नावाखाली शहरात फिरत असल्याने बाधित लोकांच्या हातावर शिक्का मारण्याचे बंधनकारक करावे, अशी सूचना कदम यांनी तहसीलदार एफ. आर. शेख यांना केली. तर काही डॉक्टर स्वतः करोनाबाधित असून राजरोसपणे करोनाबधित रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याबाबत चौकशी करून त्या डॉक्टरवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.