देवळाली प्रवरातील ‘त्या’ बाधित व्यक्तीच्या परिसरात नाकाबंदी
सार्वमत

देवळाली प्रवरातील ‘त्या’ बाधित व्यक्तीच्या परिसरात नाकाबंदी

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील शेटेवाडी भागात एका वस्तीवर 36 वर्षीय करोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून नगरपरिषदेने या ठिकाणी तातडीने जंतुनाशकाची फवारणी करून नाकाबंदी केली आहे. या भागातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून वैद्यकीय पथक संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.

नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले, 22 मार्चपासून करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले. करोना व्यवस्थापन कमिटीचा अध्यक्ष म्हणून नगरपरिषद हद्दीतील सुमारे 50 हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याने माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी उपाध्यक्ष प्रकाश संसारे सर्व नगरसेवक बंधू, भगिनी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांनी नगरपरिषद हद्दीत अत्यंत प्रभावीपणे सर्व उपाययोजना केल्या.

परंतु दुर्दैवाने तब्बल साडेचार ते पाच महिन्यानंतर परिसरातील एका वस्तीवर करोनाबाधित रुग्ण सापडला. हा रुग्ण नगरपरिषद हद्दीबाहेर असलेल्या एमआयडीसीमध्ये एका दूध प्लांटमध्ये कामाला होता. या ठिकाणी त्याचा तांदूळवाडी ता. राहुरी येथील करोनाबाधित असलेल्या व्यक्तीशी संपर्क आला. त्यानंतर या व्यक्तीने नगर येथे खासगी रुग्णालयात करोनाची तपासणी करून घेतली. यावेळी त्यासोबत इतर 11 व्यक्ती तपासणीसाठी होत्या. त्या 11 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला.

मात्र, या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. स्त्राव तपासणीसाठी घेतल्यानंतर त्यास संशयित म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर काल त्याने तेथून पलायन केले व शेटेवाडी भागात असणार्‍या त्याच्या घरी आला. भ्रमणध्वनी बंद करून ठेवला. सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी सांगितल्यानंतर मी सोबत बाधित व्यक्तीच्या वस्तीवर गेलो व त्याला व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय पथकासोबत क्वारंटाईन होण्यासाठी जाण्यास विनंती केली. वैद्यकीय पथक त्याला राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील क्वारंटाईन कक्षात घेऊन गेले.

सुरक्षित म्हणून समजल्या जात असलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत सापडलेल्या 36 वर्षीय करोना बाधित व्यक्तीला राहुरी येथील कृषी विद्यापीठातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी बाधित व संशयित असे दोन वेगवेगळे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. संशयित कक्षात या रुग्णाची आई, पत्नी व दोन मुलांना ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्त्राव तपासणीसाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल काय येतो? यावर बाकीची उपाययोजना अवलंबून राहील. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा परिसरात शोध सुरू असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com