देवळाली प्रवरात दोन ठिकाणी घरफोडी

देवळाली प्रवरात दोन ठिकाणी घरफोडी

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

देवळाली प्रवरा- चिंचोली फाटा रस्त्यालगत असणार्‍या आसाराम पाटील ढुस वसाहतीमधील शिक्षक कॉलनीत काल गुरुवार दि. 20 मे रोजी पहाटे 3 वाजणेच्या सुमारास दोन ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये एक दुचाकी व घरातील सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे. मात्र, घरी कोणी नसल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला? याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डींग झाले आहे. यामध्ये चार चोरटे स्पष्ट दिसत आहेत. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

शिक्षक कॉलनीत राहणारे मेजर किरण लोंढे यांच्या घरात पहाटे 3 वाजणेच्या सुमारास चोरी झाली. मेजर लोंढे हे दिल्ली येथे सैन्यामध्ये कर्तव्य बजावत असल्याने घरी कोणी नव्हते. या गोष्टीचा फायदा घेऊन चार ते पाच चोरट्यांनी त्यांच्या राहात्या घराचे कुलूप तोडून काही रोख रक्कम, सोन्याचे दागदागिने व घराच्या पडवीत लावलेली पल्सर मोटारसायकल क्रमांक एम.एच. 17 सीएफ - 7808 ही चोरुन व घरात कपाट व पेटीचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात उचकापाचक केली. घरात मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.

या चोरीनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच असणारे सोमनाथ शहाणे यांच्या घराकडे वळविला व त्यांच्या घराचे कुलूप तोडले. परंतु त्या ठिकाणी त्यांना काहीच सापडले नाही. आणखी बर्‍याच ठिकाणी घरफोडी करण्याचा त्यांचा डाव होता. परंतु रात्री गस्त घालणारे डॉ. विश्वास पाटील, मेजर उंडे, पप्पू सोनावणे, पी.आय.ओ.टिक्कल, सुनील गायकवाड यांची चाहूल लागताच चोरट्यांनी पोबारा केला. अन्यथा बर्‍याच घरफोड्या झाल्या असत्या.

दरम्यान याबाबतच्या घटनेचे शेजारी असलेल्या इमारतीवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये चित्रण झाले आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास चार ते पाच चोरटे तोंडाला काळे कापड लावलेले व हातात गज घेऊन शेजारच्या बोळीतून येतांना व मेंजर लोंढे यांच्या घरात घुसतांना दिसत आहेत. याबाबत देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकीला सकाळी कळविले असता पो.हे.कॉ. प्रभाकर शिरसाठ, टिक्कल पो.का. सचिन फाटके, पो.काँ. पारधे यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com