देवळालीत एका अधिकार्‍याला करोनाची बाधा
सार्वमत

देवळालीत एका अधिकार्‍याला करोनाची बाधा

तीन कर्मचार्‍यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले ; राहुरी विद्यापीठात क्वारंटाईन केले

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- येथील एका कार्यालयातील एक उच्चपदस्थ अधिकार्‍याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने देवळाली प्रवरात करोनाने खाते खोलले आहे. त्या अधिकार्‍याच्या संपर्कात आलेल्या देवळाली प्रवरा येथील तीन कर्मचार्‍यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. संशयितांचे नमुने तपासणीसाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून उद्या सायंकाळपर्यंत अहवाल येणे अपेक्षित असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी दिली.

येथील एका कार्यालया मधील एक अधिकारी राहाता येथून रोज जाऊन-येऊन काम करीत होते. ते राहाता येथे तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तीन कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांना कृषी विद्यापीठ, राहुरी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे तिन्ही कर्मचारी देवळाली प्रवरा शहरातील असल्याने शहरवासियांची धाकधूक वाढली असून सर्वांचे लक्ष त्यांचा अहवाल काय येतो? याकडे लागले आहे.

दोन दिवसांपूर्वीच केसापूर येथील पती-पत्नी व मुलगा असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आत्तापर्यंत केसापूर येथील तीन रुग्णांसह 53 जणांना विद्यापीठ येथे क्वारंटाईन करण्यात आले. आता त्यामध्ये आणखी तीन जणांची समावेश झाल्याने ही संख्या 56 वर गेली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मासाळ यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com