देवकौठे येथे महसूलमंत्री थोरात यांची छबी असलेले छायाचित्र ठरले आकर्षण

देवकौठे येथे महसूलमंत्री थोरात यांची छबी असलेले छायाचित्र ठरले आकर्षण

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा सर्वात मोठा आहे. बोटा ते देवकौठे असा 110 किलोमीटर असलेल्या संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र सर्वांसाठी आकर्षण बनले. देवकौठे येथील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र आबालवृद्धांसाठी सेल्फी पॉइंट ठरले आहे.

देवकौठे गाव हे संगमनेर तालुक्याच्या उत्तर टोकावर असून अहमदनगर जिल्ह्याच्या देखील उत्तर टोकावर आहे. संगमनेर, सिन्नर, कोपरगाव या तीन तालुक्याच्या संगमावरील या गावात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विविध विकास योजना राबविल्या असून हे गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहे. येथील दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन व्यवसाय हा संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरत आहेत. अत्यंत दुष्काळी भागात असूनही दररोज दहा हजार लिटरचे दूध उत्पादन करणार्‍या गावाने दररोज सात लाख अंडी निर्माण करण्याचा विक्रम केला आहे.

विविध विकास कामांमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण झालेल्या या गावात नव्याने दूध संस्थेने अत्याधुनिक व वैभवशाली इमारत बांधली आहे. या इमारतीच्या दर्शनी भागावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आकर्षक छायाचित्र लावले आहे. जगदंबा देवीचे अत्यंत सुंदर व आकर्षक असलेले मंदिर या परिसरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली ऐतिहासिक व पौराणिक बारव ही या गावची ओळख राहिली आहे. या बारावातील चोर खोली वरूनच या गावाला चोरकौठे असे नाव पडले होते, अशी आख्यायिका आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या गावाचे नाव चोरकौठे बदलून आता देवकौठे केले आहे. येथील मंदिर व बारव पाहण्यासाठी अनेक पर्यटक व भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तर टोकावरच्या प्रवेश द्वारावरील हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र सर्वांचे आकर्षण ठरले.

देवकौठे गावच्या दर्शनी भागात असलेल्या या इमारतीच्या परिसरात संगमनेर, सिन्नर, कोपरगाव या तालुक्यांमधील अनेक नागरिक व आबालवृद्ध आल्यानंतर या इमारतीसमोर सेल्फी काढण्याचा त्यांना मोह आवरत नाही. उत्तर नगर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची छबी सर्वांचे आकर्षण ठरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com