देवी मंदिर परिसरात भरोसा सेलचा वॉच

नवरात्र उत्सवात महिला, मुलींना त्रास देणार्‍या रोडरोमियोंचा बंदोबस्त
देवी मंदिर परिसरात भरोसा सेलचा वॉच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी व विविध कार्यक्रमासाठी घराबाहेर पडणार्‍या महिला, मुलींना त्रास देणार्‍या रोडरोमियोंचा बंदोबस्त भरोसा सेलच्या दामिनी पथकाकडून केला जाणार आहे. गेल्या दोन दिवसात पाच रोडरोमियोंविरूध्द कारवाई करून त्यांना समज देण्यात आल्याची माहिती भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी दिली.

सोमवारपासून भक्तीमय वातावरणात नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली. गेली दोन वर्षे करोनामुळे उत्सवाला मर्यादा होत्या. यंदा मात्र विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरात केडगाव, बुर्‍हाणनगर, एमआयडीसी, पाईपलाईरोड येथील देवी मंदिरात मोठी गर्दी होत असते. दर्शनासाठी, गरबा खेळण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या महिला, मुलींना रोडरोमियोंकडून त्रास दिला जातो.

यातून छेडछाडीच्या घटना घडत असतात. अशा रोडरोमियोंंचा बंदोबस्त करण्यासाठी भरोसा सेलचे पथक मंदिर परिसरात साध्या वेशात असणार आहे. तेथे असणार्‍या रोडरोमियोंवर पोलिसांची नजर असणार आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवसात भरोसा सेलच्या पथकाने महिला, मुलींना त्रास देणार्‍या पाच रोडरोमियोंना पकडून संबंधीत पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरूध्द प्रतिबंधक कारवाई करून त्यांना समज देवून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com