देवगड येथे यंदा दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा करणार

देवगड येथे यंदा दत्तजयंती सोहळा उत्साहात साजरा करणार

दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच प्रवेश; मुखपट्टी बंधनकारक

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

श्रीक्षेत्र देवगड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही भगवान दत्तात्रेयांचा जन्मसोहळा उत्साहात साजरा होणार असून संस्थान प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहे. करोना साथीचा धोका अजूनही टळलेला नसल्यामुळे सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम पाळून श्री दत्त जयंती महोत्सव साजरा करण्याचे संस्थान प्रशासनाने ठरविले आहे.

श्री दत्त जन्मसोहळा शनिवार दि. 18 डिसेंबर रोजी सायं. 6 वाजता होणार असून त्यानिमित्त रविवार दि. 12 डिसेंबर ते रविवार दि. 19 डिसेंबर या कालावधीत नामसप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

करोनाच्या नवीन प्रजातीचा धोका लक्षात घेऊन, फक्त कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र धारकासच मुख्य मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे.

बससेवा बंद असल्यामुळे खासगी वाहनाने येणार्‍या भाविकांच्या वाहनांची विभागणी दोन विभागात करण्यात येणार असून, संपूर्ण लसीकरण झालेल्या व तसे प्रमाणपत्र असलेल्या भाविकांची वाहने एका बाजूस व लसीकरण न झालेल्या भाविकांची वाहने दुसर्‍या बाजूस लावण्यात येतील. यात्रेमध्ये दुकानांना परवानगी असेल, तथापि दुकानदार व त्याचे मदतनिसांचे लसीकरण झालेले असावे. मुखपट्टी अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ दुकानदारांनी कमर्शियल गॅस सिलिंडरचा वापर करावा व दुकानात वैध तारखेचे अग्निशमन उपकरणे ठेवणे बंधनकारक आहे.

येणार्‍या भाविकांनी सुरक्षेचे व स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळून संस्थान प्रशासन व शासन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com