
लोणी |वार्ताहर| Loni
भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री असे सांगण्याची राष्ट्रवादीमध्ये पद्धत आहे. उद्धव ठाकरेंना तरी मुख्यमंत्री होऊ असे कुठे वाटले होते, अशी खोचक प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशी मार्मिक टिप्पणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लोणी येथील महसूल व वन विभाग परिषदेच्या समारोपासाठी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, शरद पवार कधी पोटनिवडणुकीच्या प्रचारात यापूर्वी उतरले नव्हते. आता ते उतरले आहेत. मुख्यमंत्री आणि मी प्रचारात उतरलो म्हणून कुणी काही बोलत असेल तर त्याला अर्थ नाही. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात लाज वाटण्यासारखे काय आहे?
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे आमचे विरोधक आहेत, शत्रू नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे.त्यांनी वेगळे विचार स्वीकारले आणि आमचे विचार वेगळे आहेत. मात्र राजकारणात अलीकडच्या काळात आलेले शत्रुत्व योग्य नाही हे बदलायला हवे. संजय राऊत यांना माझी क्षमता अधिक वाटत आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.ते नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी वस्तुस्थिती पाहून व लोकांना खरे वाटेल असे बोलले पाहिजे .
यावेळी लोणीतील महसूल परिषदेबद्दल बोलताना ते म्हणाले, या परिषदेतून महसूल विभागाचा रोड मॅप तयार झाला आहे. त्यातून कामाला गती येईल. वाळू बाबतचे पारदर्शक धोरण आणण्यास मदत होईल. वेगवेगळी प्रमाणपत्र आता एका अर्जावर मिळण्याची सुविधा निर्माण होणार आहे. बिनशेती करणे सोपे होईल. घरकुल योजनेला गती येईल. कृषी फिडर सौर ऊर्जेवर आणून पुढच्या दोन-तीन वर्षात सौर उर्जेद्वारे 4 हजार मेगा वॅट वीज निर्माण करून शेतीसाठी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आहे.त्याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.