
अहमदनगर | प्रतिनिधी
खेळाप्रमाणेच सध्या राजकारणातही कुस्ती सुरू आहे. मात्र, जसे कुस्तीमध्ये डोपिंग आले, काहीजण नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केले गेले. राज्याच्या राजकारणातही काहीजण सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीमधून बादच व्हावे लागते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
नगर येथील छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. खा. राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारचे डेथ वॉरंट निघाले. १५ दिवसांत सरकार कोसळेल, असा दावा करत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
राज्याच्या राजकारणातही काही जण सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीमधून बादच व्हावे लागते. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्ती जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. २०२४ मध्ये पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू द्या, असा टोलाही फडणवीस यांनी राऊत यांना लगावला.
दरम्यान, नगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करावा, मी व एकनाथ शिंदे त्याला मंजुरी देऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. कुस्ती या खेळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाश्रय दिला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी चांदीच्या गदेची परंपरा सुरू केली होती. नगरमधून सोन्यांच्या | गदेची नवी परंपरा सुरू झाली, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी यावेळी काढले.
आयबीवर कॉफी टेबल
नगर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर काही काळ थांबले होते. त्यांनी कॉफीचा स्वाद घेत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. राम शिंदे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. जिल्ह्यात सध्या बाजार समितीच्या निवडणूका सुरू असून काही ठिकाणी भाजपचे स्थानिक राष्ट्रवादीसोबत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर टाकण्यात आले. विशेष करून कर्जत- जामखडे असे घडत असल्याचे यावेळी फडणवीस यांना सांगण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांनी स्वतंत्रपणे विखे आणि शिंदे यांच्याशी चर्चा केली.