शहरातील विकास कामांना मुदतवाढ द्या !
सार्वमत

शहरातील विकास कामांना मुदतवाढ द्या !

नोंदणीकृत ठेकेदारांची आयुक्तांकडे मागणी

Arvind Arkhade

अहमदनगर| प्रतिनिधी| Ahmednagar

शहरामध्ये महापालिका बांधकाम विभागा अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. परंतु, मार्चपासून करोना महामारीमुळे आलेल्या संकटामुळे हे विकासकामे करताना विविध समस्या, अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कार्यारंभ आदेशांना मुदत वाढ तसेच जी कामे सुरू आहेत. त्यांनाही मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महापालिकेतील नोंदणीकृत ठेकेदारांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शहरात लॉकडाऊन असणे, कंटेन्मेंट झोन असणे, वाहतुकीस परवानगी नसणे, काही कामगारांना करोनाची लागण होणे. यामुळे कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. 29 जुलैरोजी शासनाने विकास कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतन यांच्या अखत्यारीत मटेरियलचे टेस्ट रिपोर्ट आणि थर्ड पार्टी रिपोर्ट असतात. मात्र, तेथे कंटेन्मेंट झोन असल्याने आणि तेथे कोव्हिड सेंटर सुरू केल्याने या ठिकाणी कर्मचारी वर्ग उपस्थित नसतात. त्यामुळे टेस्ट रिपोर्ट आणि थर्ड पार्टी रिपोर्ट मिळण्यास अडचणी येतात.

विकास कामांसाठी लागणारे साहित्य मिळण्यासही शहर बंदी असल्याने मटेरियल उपलब्ध होत नाही. अशाप्रकारे अडचणींमुळे मंजूर कामाचे कार्यारंभ आदेश परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत देण्यात येऊ नये, अथवा कार्यारंभ असलेल्या कामांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे. या निवेदनावर सुनील राऊत, अभिजित काळे, एस.एस.शेख, आनंद पुंड, राजेंद्र लोणकर, ए. पी. सोनीमंडलेचा, अंबादास चौधरी, ए. सी. कोठरी, विजय म्हस्के, अनिल वाबळे आदी ठेकेदारांच्या सह्या आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com