8 दिवसांत विकास महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

राजूरच्या मोर्चात माजी आमदार वैभव पिचड यांचा इशारा
8 दिवसांत विकास महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

राजुर |वार्ताहर| Rajur

आठ दिवसांत हिरडा खरेदी केंद्र सुरू केले नाही तर आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकू , असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे. हिरडा खरेदी केंद्र सुरू करावे तसेच मागील वर्षी खरेदी केलेल्या भाताचा बोनस तात्काळ मिळावा या मागणी साठी भाजपाने आदिवासी विकास महामंडळाच्या राजूर कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय देशमुख, भरत घाणे, सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, भाजपा शहराध्यक्ष संतोष बनसोडे, विजय भांगरे, पांडुरंग खाडे, कुंडलीक वाळेकर, गोरख परते, काळू मोहंडुळे, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय देशमुख, अमोल गवांदे आदी मान्यवरांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार पिचड म्हणाले, अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम व डोंगराळ भागात राहतात. तेथे हिरड्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाकडून हिरडा केंद्रामार्फत हिरडा खरेदी केली जात होती. परंतु मे महिना संपत आला तरी अजुनही हिरडा खरेदी केंद्र सुरू केले नाही. गोरगरीब आदिवासी जनतेची त्यामुळे लुटमार होत असून दोनशे रुपये भावाचा हिरडा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

हे कमी की काय म्हणून मागील वर्षी विकलेल्या भाताला बोनस देणार असे सांगणारे आघाडी सरकार आता हात वर करू पहात आहे. आता मात्र आम्ही शांत बसणार नाही. आदिवासींच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवणारे या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक एन. एम. राजपूत यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com