ना ऑक्सिजन, ना इंजेक्शन ; देवळाली प्रवराचे कोव्हीड सेंटर ठरतेय नवसंजीवनी!

जिल्ह्यात आदर्शवत
ना ऑक्सिजन, ना इंजेक्शन ; देवळाली प्रवराचे  कोव्हीड सेंटर ठरतेय नवसंजीवनी!

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यात करोना महामारीचा उद्रेक सुरूच आहे. या पार्श्‍वभूमीवर दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असतानाच देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथेही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

पर्यायाने या दोन्हीही ठिकाणी रुग्णांना उपचार मिळणे अत्यावश्यक बनले आहे. इच्छा असेल तर मार्ग दिसतो, याचा प्रत्यय आला. देवळाली प्रवरा येथे निवृत्त स्वीय सहाय्यक दत्तात्रय कडू यांनी शासकीय स्तरावर व आमदार कानडे यांच्याकडे पाठपुरावा करून 50 खाटांचे शासकीय कोव्हिड सेंटर देवळाली प्रवरासाठी मिळवून दिले. तर राहुरी फॅक्टरी येथे नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी शिवबा प्रतिष्ठानच्यावतीने आपल्या व्यवसायाच्या जागेतच 20 खाटांचे कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे आता परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

देवळाली प्रवरा शहरातील कोव्हिड सेंटरमध्ये आर्थिक ऐपत नसलेल्या रुग्णांनी पाठ फिरविली होती. ही गैरसोय हेरून कडू यांनी एक महिन्यापासून पाठपुरावा केला. त्यामुळे येथे शासकीय कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आश्‍चर्य म्हणजे चारच दिवसांत सुमारे 40 रुग्ण या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. रुग्णांना अतिशय माफक दरात जेवण, नाश्ता दिला जातो. विशेष म्हणजे ना ऑक्सिजन, ना इंजेक्शन, अशा परिस्थितीत अत्यंत कमी दरातील गोळ्या औषधे देण्यात येऊन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे काही कोव्हिड सेंटरमध्ये लाखो रुपये उकळणार्‍या चालकांना लगाम बसणार आहे. कडू यांच्या संकल्पनेतून सुरू केलेले हे शासकीय कोव्हिड सेंटर देवळाली पॅटर्न म्हणून जिल्ह्यात आदर्शवत ठरले आहे.

देवळाली प्रवरा पसिरातील अनेक गरीब नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र, महागड्या उपचारामुळे आर्थिक ऐपत नसलेल्या रुग्णांनी घरीच राहून जमेल तसा उपचार सुरू केला आहे. त्यामुळे गावात संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला होता. गरीब रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शासनस्तरावर व आ. लहू कानडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. स्थानिक डॉक्टरांनीही रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिल्याने परिश्रमाची फलश्रृती झाली. बेसहारा गोरगरीब रुग्णांना आता सहारा मिळाला आहे. - दत्तात्रय कडू, देवळाली प्रवरा

करोनाचे संकट आले व हळूहळू त्याने उग्र रूप धारण केले आहे. समाजप्रति आपली बांधीलकी असल्याने आदिनाथ कराळे यांनी नामदार प्राजक्त तनपुरे यांचे सहकार्य घेऊन इतर काही संस्थांच्या मदतीने कणगर येथे जिल्हा परिषद शाळेत 50खाटांचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले.मात्र सध्या सर्वत्र कोव्हिड रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे,ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड पाहून स्वतःचा व्यवसाय असणार्‍या जागेचे कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदिनाथ कराळे, नगरसेवक, राहुरी फॅक्टरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com