देवळाली प्रवरा परिसरात ओला दुष्काळसदृश स्थितीने शेतकरी हताश

खरीप पिके सडू लागली || जनावरांच्या चार्‍याचाही शेतकर्‍यांपुढे मोठा प्रश्न
देवळाली प्रवरा परिसरात ओला दुष्काळसदृश स्थितीने शेतकरी हताश

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devalali Pravara

सप्टेंबर महिन्यात सलग 20 दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके जवळपास गेली आहेत तर जनावरांना खायला चारा राहिला नाही. जवळपास 60 ते 70 वर्षांनंतर एवढी भयानक परिस्थिती ओढवल्याचे वयोवृद्ध मंडळी सांगतात. शेतकरी हताश झाला झाल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी 1952-55 साली असा पाऊस झाला होता. तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी जनावरांना लिंबाचा पाला खाऊ घालून जगवले होते. तर माणसं कांदे उकडून खाऊन कसेबसे जगले होते. आज अन्नधान्य सरकारकडे भरपूर असले तरी शेतकर्‍यांच्या हातून खरीप जाण्याची शक्यता असून ओल्या दुष्काळाचे चिन्ह आहेत.

दरम्यान रोज पडणार्‍या पावसामुळे शेतातील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बाप्पा गेले आणि एक सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कधी रात्रभर तर कधी दिवसभर, कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस गेली 20 दिवस पडला आहे.

यापूर्वी अशाप्रकारे पाऊस झाल्याचे आठवत नाही. रोज होणार्‍या पावसामुळे घास, सोयाबीन, बाजरी ही पिके गेली आहेत. शेतकर्‍यांनी पिकात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी विद्युत मोटारी बसवून पाणी काढण्याचे काम सुरू केले. आता फक्त हताश नजरेने पाण्यात सडणार्‍या पिकांकडे पहाण्या पलिकडे त्याच्या हातात काहीच राहिलेले नाही. यंदा सुरुवातीपासूनच खरिपातील सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका, चारा पिके घास, गिन्नी गवत व नगदी पीक म्हणून ओळख असलेले पारंपरिक ऊस पिकासह सर्व पिके वेळेवर पाऊस पडत गेल्याने तरारली होती. हिरवेगार दमदार पीक पाहून बळीराजा खुश झाला व त्याने खते व महागडी किटकनाशके पिकावर मारण्यास अजिबात हयगय केली नाही.

दरवर्षी शेतकरी रब्बीतून हुकला तर त्याची खरिपावर मदार असते. परंतु यंदा रब्बी पिकाला भाव नसल्याने कांदा मातीमोल भावात विकण्याची वेळ आली तर आसमानी संकटामुळे खरीप हातचे जाणार आहे. घास, मका ही चारा पिके गेली तर जनावरांना काय खायला घालणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. माणसं कशीही जगतील पण जनावरांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची गरज

कांदा निर्यातबंदी असल्याने तो मातीमोल भावात विकला जात आहे. गव्हाची निर्यात थांबल्याने गहू पिकाचे भाव स्थिर झाले.ऐन पावसाळ्यात लम्पी आजाराने डोके वर काढल्याने अनेक जित्राबं लम्पीने ग्रस्त झाली आहेत. पावसामुळे या जनावरांना लसीकरण करण्यात मोठा व्यत्यय येत आहे. शेतकर्‍यांना यातून बाहेर काढण्यासाठी दोन लाखांच्यावर कर्ज असणार्‍या थकीत शेतकर्‍यांची कर्जमाफी सरकारने करावी व खरीप पिकांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com