देवळाली प्रवरासह तालुक्यात पावसाचा हाहाकार

वादळी वार्‍यामुळे गोठ्यांचे पत्रे उडाले शेतीला आले तळ्यांचे स्वरूप
देवळाली प्रवरासह तालुक्यात पावसाचा हाहाकार

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

गेल्या आठवड्यापासून देवळाली प्रवरासह तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू असून शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात वादळीवार्‍यासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडल्याने परिसरासह तालुक्यातील खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेतीला तळ्याचे स्वरुप आले आहे तर प्रचंड वादळीवार्‍यांमुळे उभी पिके भुईसपाट झाली असून अनेकांच्या जनावरांच्या गोठ्यांचे छत उडून गेले आहेत.

शुक्रवारी श्रीगणेशाचे विसर्जन असल्याने गणेश मंडळं विसर्जनाच्या तयारीला लागली होती.रात्री आठ नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेकांनी पावसाचा आनंद घेत बाप्पाचे विसर्जन केले. मात्र शनिवारी रात्री साडे आठ वाजता सुरु झालेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडून दिला. विजांचा प्रचंड कडकडाट व प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच नेहमी प्रमाणे वीज गायब झाल्याने एखाद्या भयपटाला लाजवेल असे दृष्य दिसत होते. एकीकडे विजांचा कडकडाट व विजांच्या प्रकाशात आभाळ फाटल्यासारखा धो धो पडणारा पाऊस व वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या जनावरांच्या गोठ्यावरील ताडपत्रीचे छत उडून गेल्याने दूभती जनावरे रात्रभर पावसात भिजत होती.

सुमारे दीडतास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्यानाल्यांना पूर आले.ओढ्याचे पाणी पिकात शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. सकाळी शेतात गेल्यानंतर शेतकर्‍यांना शेताला तळ्याचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. सोयाबीन, कपाशी, ऊस, मका, घास, गिन्नीगवत, कडवळ या चारा पिकांसह सर्व पिकात पाणी साचले होते. हे सर्व चित्र पाहून बळीराजा हवालदिल झाला आहे. आधीच येलो मोझॅकने आक्रमण करून सोयाबीनचा काटा केला होता. कशीबशी किटकनाशकांचे फवारे मारुन ती जगवली तर काढणीला आलेल्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने या पिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हीच अवस्था कपाशी पिकाची झाली असल्याने तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेले खरिपाचे पीक हातून जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजाचे पुरते कंबरडेच मोडले आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात साचलेले पाणी काढून देण्याचे काम दिवसभर सुरुच होते. परत जर पाऊस झाला तर खरीप पिकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही अशी गंभिर स्थिती निर्माण झाली असून पावसाने झोडपले व राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची अशा आस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा अडकला आहे. एका दाण्याचे हजार दाणे करणारा जगाचा पोशिंदा आज प्रचंड संकटात सापडला आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने भरघोस आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्यावतीने करण्यात येत आहे.

ज्या शेतकर्‍यांनी खरीप पिकाचा विमा उतरवला आहे.अशा शेतकर्‍यांच्या पिकाचे संबंधित विमा कंपनीने तातडीने पंचनामे करून त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अन्यथा विमा कंपनीवर लोकांचा जो काही थोडाफार विश्वास आहे तो देखील नष्ट होईल. यासाठी ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करुन शासनाने त्वरीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

दरम्यान रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर भरपावसात अंधारात हातात टॉर्च घेऊन महावितरणच्या कर्मचार्‍यांनी दोष कुठे झाला याचा शोध सुरू केला. परंतु त्यांना दोन तिन ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने रात्री ही मोहीम थांबवावी लागली परंतु सकाळी भरपावसात पोलवर चढून दोष काढून वीजपुरवठा सुरळीत सुरु केला. याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com