देवळाली प्रवरा परिसराच्या पुरग्रस्त भागात विदारक परिस्थिती

नुकसानग्रस्तांची शासनाकडून अव्हेलना || फक्त आश्वासनांची खैरात
देवळाली प्रवरा परिसराच्या पुरग्रस्त भागात विदारक परिस्थिती

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

20 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटीने गुहा परिसरातील शेततळे फुटले, शेततळ्याचे पाणी बंधार्‍यात गेल्याने, बंधारे फुटले आणि बंधार्‍याचे पाणी खाली असलेल्या देवळाली प्रवरा परिसरात आले. व परिसरात पूर आला. हा पूर ओसरला पण, शेतकर्‍यांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे काय? दोन दिवसावर सण येऊन ठेपला असतांना या नैसर्गिक आपत्ती मधून सावरणार कसे? असा मोठा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरीबांधवांना पडला आहे.

गुरुवारी पहाटे झालेल्या ढगफुटीचा फटका गुहा-देवळाली प्रवरा शिवे लगत राहणार्‍या देवळाली प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांसह पुराचे पाणी खाली आल्याने वाकाण वस्ती भागातील शेतकर्‍यांना मोठ्याप्रमाणात बसला.

सकाळी 9 वाजता अचानक आलेल्या पूराच्या पाण्याने अवघा परिसर जलमय झाला. शंभर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पठारेमामा फरशी मध्ये प्रचंड पाणी असल्याने देवळाली प्रवरा-श्रीरामपूर रस्त्यावरील वाहतूक 24 तास वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला. सायंकाळी डेअरीला दूध देखील घेऊन येता आले नाही.

देवगिरे वस्ती पासून वाकाण वस्ती पर्यंच्या पट्ट्यात असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही की, त्याचे पिक वाहून गेले नाही. व बांध तुटून गेले नाही. या पुरात रस्त्याच्या कडेला असणार्‍या प्रत्येक कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्यासह संसारोपयोगी सामान भिजले.तर शेतात काढणीला आलेले व काढणी झालेले सोयाबीन, वेचणीस आलेली कपाशी, तोडीस असलेला ऊस चारा पिके या सर्वांची वाट लागली.

पिके तर पाण्याखाली गेलीच पण काही ठिकाणी जमिन खळवटून गेल्याने पिकावर गाळ जाऊन बसला आहे. काहीच्या कांदाचाळी वाहून गेल्या. लागवडीला आलेल्या कालवडी, शेळ्या, कोंबड्यासह दारासमोर असलेले शेणखताचे उकीर्डे देखील वाहून गेले. काहींच्या तर विहीरी पडल्या आहेत. या सर्व नुकसानीचा अंदाज घेतला तर कोट्यावधीची नुकसान शेतकरी बांधवाचे झाले आहे. काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन बसले आहे.

दोन दिवसावर आलेला वर्षाचा दिवळीचा सण कसा साजरा होणार? दिवाळी साठी सोयाबिन विकून दोन पैसे मिळणार होते. कापूस विकून दोन पैसे हातात मिळणार होते. पण या सर्वांवर आता पाणी फिरले आहे. यातून सावरण्यासाठी सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.

माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम फौंडेशन व पुणे येथिल उद्योजक जगदीश कदम यांच्या राजश्री कदम प्रतिष्ठानच्या वतीने संयुक्तपणे चार वर्षापूर्वी परिसरातील ओढ्यानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी राबविलेल्या या जलसंधारणाच्या कामाची अनेकांनी खिल्ली उडवली.अनेकांनी टिका केली तर काहीनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण आज याच ओढ्यानाल्यांच्या खोली व रुंदीकरणामुळे देवळाली प्रवरा परिसर पुराच्या तडाख्यातून वाचला. ही ओढी जर उथळ असती तर किंवा यांचे रुंदीकरण, खोलीकरण झाले नसते मात्र गावच्या पुर्वेचा व उत्तरेचा परिसर नेस्तनाबूत झाला असता हे नाकारुन चालणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com