देवळाली प्रवरा परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण

देवळाली प्रवरा परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने दाणादाण

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

काल पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाःकार उडून दिला. देवळाली प्रवरा परिसरातील बंधारे, शेततळे फुटल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. शेतात पाणी शिरल्याने देवगिरे वस्ती येथील जमिनी खळवटून गेल्या, कांदाचाळ वाहून गेली, गोठ्यातील कालवडी वाहून गेल्या, ठिबकसिंचन संच, शेळ्या, कोंबड्या, शेतातील काढलेले सोयाबीन ओढ्या वरील पुल वाहुन गेल्याने देवळाली प्रवरा -गुहा शिवेलगत असलेल्या देवळाली प्रवरा परिसरातील देवगिरी, ढुस, पठारे, लंके, येवले, कडु या वस्त्यांना पाण्याने वेढा घातल्याने बेटाचे स्वरुप आले होते.

तर ओढ्या नाल्यांना पुर आल्याने देवळाली प्रवरा चिंचोली फाटा हा रस्ता पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक बंद झाली होती तर देवळाली प्रवरा - श्रीरामपूर रस्त्यावरील पठारे मामा फरशीत मोठ्याप्रमाणात पाणी असल्याने दिवसभर हा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाल्याने संपर्क तुटला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रवींद्र ढुस यांच्या वस्ती वरील नारळाच्या झाडावर प्रचंड आवाज करीत विज पडल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले. आमदार लहू कानडे यांनी तातडीने अपातग्रस्त भागाला भेट देऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन नूकसानग्रस्तांना मदत करण्याचे शासकीय अधिकार्‍यांना आदेश दिले.

यावेळी तहसीलदार एफ.आर.शेख, पो.नि.प्रताप दराडे, मुख्याधिकारी अजित निकत, तलाठी दिपक साळवे, सत्यजित कदम फौडेशनचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सचिन ढुस, डॉ. विश्वास पाटील, माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. देवळाली प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांचे बंधारे फुटल्याने मोठ्याप्रमाणात शेतीचे नूकसान झाले आहे. त्यांचे नूकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत देण्याचे आदेश शासकीय अधिकार्‍यांना देऊन शेतकर्‍यांची विचारपूस करुन त्यांना धिर देण्याचे काम आ. कानडे यांनी केले.

काल पहाटे झालेल्या ढगफुटी सारख्या पावसाने गुहा परिसरातील एक मोठा बंधारा फुटला. त्या खालोखाल असलेले चार बंधारे व पाच शेततळे फुटल्याने पुराचे पाणी देवळाली प्रवरा परिसरातील-गुहा शिवे लगत असलेल्या अशोक देवगिरे, भाऊसाहेब देवगिरे, दत्तात्रय देवगिरे, बाळासाहेब देवगिरे यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तू व धान्य भिजले. कांदा चाळ, कालवढी वाहून गेल्या.

पुराचे पाणी खाली असलेल्या गाढे, शेख, मुसमाडे, येवले, चव्हाण, गायकवाड, वाळुंज, ढुस, कराळे, दळवी, ठेपे, केंदळकर यांच्या वस्तीवर शिरल्याने अनेक ठिकाणी जमिनी खळवटून गेल्या. शेतील काढणीला आलेले सोयाबीन, कपाशी, ऊस ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाले आहे. हेच पाणी पुढे खाली वाकाण वस्ती भागात गेल्याने या वस्तीचा गावाशी असलेला संपर्क तुटला. दरम्यान माजी नगराध्यक्षा सत्यजित कदम हे बाहेर गावी असल्याने त्यांनी त्यांच्या कार्यकर्तेना पुरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सुचना दिल्या व सायंकाळी स्वतः या भागाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले.

ढगफुटीसदृश्य पावसाने या भागातील शेतकर्‍यांच्या विहीरी पुराच्या पाण्याने पडल्या जमिनी वाहून गेल्या. शेतातील पिके नष्ट झाली. कांदा चाळी गेल्या. जनावरं गेली शेतीचे आतोनात नूकसान झाल्याने सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार कानडे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com