श्रीक्षेत्र देवगड येथे आषाढीनिमित्त किसनगिरी बाबांच्या पादुकांची क्षेत्र प्रदक्षिणा

महंत भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली मोजक्याच भाविकांचा सहभाग
महंत भास्करगिरी महाराज
महंत भास्करगिरी महाराज

देवगडफाटा (वार्ताहर)- आषाढी एकादशीनिमित्त नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्रीसमर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांची क्षेत्र प्रदक्षिणा करत पूजन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत टाळमृदंगाच्या गजरात झालेल्या क्षेत्र प्रदक्षिणा प्रसंगी ‘विठोबा-रखुमाई...’ ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत भजने गाण्यात आली.

यंदा करोनाचे संकट देशात व राज्यात ओढवल्याने पंढरपूरचा पायी दिंडी सोहळा रद्द झाला. त्यामुळे वारकरी संप्रदायातील संत-महंतांसह वारकर्‍यांना मोठे दुःख झाले.

वारीचा आनंद सर्वांना घेता आला नाही. अनेक देवस्थाने बंद होती. यामध्ये देवगडचाही समावेश होता. आषाढी एकादशीला तरी बाबांच्या पादुकांची छोटेखानी क्षेत्र प्रदक्षिणा व्हावी म्हणून भास्करगिरी बाबांच्या उपस्थितीत क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली.

यावेळी टाळमृदंगाचा गजर करणार्‍या मोजक्याच वारकर्‍यांनी प्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये मास्क घालून व सामाजिक अंतराचे पालन करत भजने गायली. त्यानंतर भास्करगिरी बाबांच्या हस्ते श्रीसमर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांचे पूजन करून अभिषेक घालण्यात आला. तसेच भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी बाबांच्या समाधी व मूर्तीलाही अभिषेक घालून पूजा करण्यात आली. करोनाचे संकट देशासह राज्यात आल्यापासून देवगडचे मंदिर बंद आहे. नित्यनेमाने पूजापाठ केले जातात.

लॉकडाऊनच्या काळात मंदिर परिसर स्वच्छता तसेच सुशोभीकरणाचे काम भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यामुळे देवगडच्या वैभवात भर पडली असून या भू लोकीच्या स्वर्गाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जीव कासावीस झालेला आहे. मंदिर दर्शनासाठी कधी खुले होते याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com