देसवंडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; आठ जखमी
सार्वमत

देसवंडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; आठ जखमी

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी| rahuri

राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना काल दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या हाणामारीत गज, कुर्‍हाड, लाकडी दांडे व तलवारसारख्या हत्यारांचा वापर करण्यात आला असून दोन्ही गटांतील आठजण गंभीर जखमी झाले आहेत. तर चारजणांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

काल सकाळी राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे शिरसाठ यांचे पत्र्याचे शेड बांधण्याचे काम सुरू होते. यावेळी तेथे कोकाटे गटातील काहीजण आले. शेड बांधण्याच्या कारणावरून शिरसाठ व कोकाटे गटात सुरूवातीला बाचाबाची झाली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच आदींनी घटनास्थळी जाऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

वाद मिटविणारे निघून गेल्यावर शिरसाठ व कोकाटे या दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी शिरसाठ गटातील प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाठ, सुरेश भाऊसाहेब शिरसाठ, अनिकेत दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब जगन्नाथ शिरसाठ तसेच कोकाटे गटातील निलेश राजेंद्र कोकाटे, दीपक अर्जुन कोकाटे असे एकूण आठजण जखमी झाले आहेत.

राहुरी येथील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी वैभव जासूद यांनी जखमींवर उपचार केले. तसेच यापैकी प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाठ व सुरेश भाऊसाहेब शिरसाठ हे चारजण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमी झालेले सर्वजण देसवंडी येथील रहिवाशी असून शेजारी शेजारी राहत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com