देसवडेत मुख्यमंत्री, आमदार, खासदारांच्या काढल्या तिरड्या

विधिवत अंत्यविधी करून उरकले दशक्रियाविधीही
देसवडेत मुख्यमंत्री, आमदार, खासदारांच्या काढल्या तिरड्या

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

मराठा आरक्षणावर ठोस भूमिका न घेणार्‍या मराठा आमदार, खासदार यांच्या प्रतिकात्मक तिरड्या काढण्यात आल्या. तसेच पूर्णपणे विधिवत अंत्यविधी करून दशक्रियाही घालण्यात आले, असे अनोखे आंदोलन पारनेर तालुक्यातील देसवडे ग्रामस्थांनी करत शासनाचे लक्ष वेधले.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागल्याचे चित्र आहे. तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ देऊनही राज्य सरकारने मराठा समाजाला केवळ झुलवत ठेवल्याचे नागरिकांची भावना झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारमधील मराठा समाजाच्या आमदार, खासदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलले नसल्याने पारनेर तालुक्यातील देसवडे येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.

देसवडे गावात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलीही ठोस भूमिका न घेणार्‍या राजकीय नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राज्य सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरडी बांधून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे फोटो असलेला बॅनर बांधून चार खांदेकरी व पाचवा पाणोड्या अशी हूबेहूब प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली.

या अंत्ययात्रेत उपस्थित असलेल्या तरुणांना अक्षरशः टाहो फोडला होता. तसेच महिलांनी यावेळी या तिरडीवरील फोटोंना जोडे मारले. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला देसवडे ग्रामपंचायतपासून सुरुवात झाली. गावातून निघालेली ही अंत्ययात्रा मुळा नदीकिनारी असलेल्या गावातील स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. त्यानंतर हिंदु रुढीपरंपरेनुसार तिरडीला अग्नीडाग देण्यात आला. तसेच यावेळी त्यांचा दशक्रियाविधी देखील करण्यात आला. या आंदोलनात महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना यावेळी देसवडे येथील सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

जरांगे यांची तब्येत खालावत आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाकडून अशा स्वरूपाची तीव्र आंदोलने करण्यात येणार आहेत असे देसवडे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com