बंदी असतानाही नगरमध्ये दांडिया, गरबाचे कार्यक्रम

करोना नियमांचे उल्लंघन: प्रशासन, पोलिसांचे दुर्लक्ष
बंदी असतानाही नगरमध्ये दांडिया, गरबाचे कार्यक्रम
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा धोका असल्याने नवरात्रोत्सव काळात गरबा, दांडिया कार्यक्रमांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. तरी देखील नगर शहरात गरबा, दांडियाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे, प्रशासन आणि पोलिसांना याची माहिती असून, देखील त्यावर कारवाई होताना दिसत नाही. या कार्यक्रमामध्ये करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नसून, आदेशाचे मात्र उल्लंघन होत आहे.

नगर शहरातील उपनगरांमध्ये गरबा, दांडिया खेळ रात्री चांगलाच रंगतो आहे. शेकडो युवक-युवतींची गर्दी या कार्यक्रमांना होत आहे. आयोजक सोशल मीडियाद्वारे संदेश देऊन दांडियाचे आयोजन करत आहेत. नगर-मनमाड रोडवरील एका लॉनमध्ये मंगळवारी रात्री दांडियाचा मोठा कार्यक्रम झाला. शेकडो तरुण-तरुणी यात सहभागी झाले होते. बंदी असताना झालेल्या या दांडिया कार्यक्रमाकडे तोफखाना पोलिसांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. मात्र काहींनी याबाबत तक्रारी केल्या. तोफखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी कार्यक्रमस्थळी गेले. पोलीस अधिकार्‍यांनी आयोजकांना कार्यक्रम बंद करण्याची तंबी दिली. पोलीस अधिकारी तेथून निघून गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा दांडियाला सुरूवात झाली.

असे अनेक कार्यक्रम सध्या शहरातील उपनगरांमध्ये रंगत आहेत. त्यावर पोलिसांकडून होत नसलेल्या कारवाईची चर्चा रंगत आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना सध्या, तरी परवानगी नाही. परंतु सध्या कोणतेच नियम पाळले जात नाही. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका संभवतो. जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण राज्यात सध्या तरी सर्वाधिक आहे. राज्यात कुठेही लॉकडाऊन नसताना, जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये लॉकडाऊन होते. त्यातून करोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात येतो. असे असताना आयोजकांनी खबरदारीने घेताना दिसत नाही. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही.

मनपाकडून आदेशाला केराची टोपली

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याची जबाबदारी महापालिकेवर देखील आहे. नगर शहरासह उपनगरांत दांडियाचे आयोजन होत असताना स्थानिक प्रशासन म्हणून महापालिकेचा याची कल्पनाही नाही, हा संशोधनाचा विषय आहे. राज्य सरकारच्या आदेशाचेच पालन महापालिकेकडून होत नसल्याची टीका जागरूक नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.