उद्यापासून ‘सार्वमत-देशदूत वेब-व्याख्यानमाला’

मान्यवर गुंफणार विचारपुष्प : सोशल माध्यमावर प्रक्षेपण
उद्यापासून ‘सार्वमत-देशदूत वेब-व्याख्यानमाला’

अहमदनगर (प्रतिनिधी)-

लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या वाचक-प्रेक्षकांसाठी ‘सार्वमत-देशदूत’ समूहातर्फे ऑनलाईन वेब-व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, 24 मे ते 30 मे या कालावधीत दररोज सायंकाळी 7 वाजता सोशल माध्यमावरून ही मालिका सर्वांसाठी खुली आहे.

सुप्रसिद्ध शिक्षण व्याख्याते, विचारवंत डॉ.संजय मालपाणी, परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे, लेखक व शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, लेखक-साहित्यिक डॉ.संजय कळमकर, प्राचार्य डॉ. गणेश राऊत, संगीत चिकित्सक डॉ.संतोष बोराडे, शिक्षण अभ्यासक हेमांगी जोशी हे मान्यवर वक्ते या वेब-व्याख्यानमालेत विचारपुष्प गुंफणार आहेत.

वाचक-प्रेक्षकांसाठी या वेब-व्याख्यानमालेचे प्रक्षेपण www.deshdoot.com या संकेतस्थळासह युट्यूबचे deshdoot हे चॅनल व DailySarvmat व Deshdoot फेसबुक पेजवर होणार आहे.

विनोदाने मला काय दिले?

सोमवार, 24 मे रोजी लेखक-साहित्यिक डॉ.संजय कळमकर ‘विनोदाने मला काय दिले?’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. डॉ.कळमकर हे स्वतंत्र शैलीचे कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. भग्न, सारांश शून्य, टोपीवाले कावळे आदी कादंबरींसह कथा, नाटके, चित्रपट लेखन त्यांच्या नावावर आहे. राज्यातील अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

गीता समजावून घेताना

मंगळवार, 25 मे रोजी सुप्रसिद्ध शिक्षण व्याख्याते, विचारवंत डॉ.संजय मालपाणी ‘गीता समजावून घेताना’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. सामाजिक, शिक्षण व उद्योग विश्वाला त्यांनी आपल्या कार्याने नवे आयाम दिले. 66 पुस्तकांचे लेखन व संपादन त्यांनी केले आहे. गीता परिवाराच्या माध्यमातून संस्कार व संस्कृती प्रसारासाठी कार्यरत असलेले डॉ.मालपाणी विविध शिक्षण संस्थांचे संस्थापक व संचालक आहेत.

विनोबा

बुधवार, 26 मे रोजी प्राचार्य डॉ. गणेश राऊत हे ‘विनोबा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. पुणे येथील देसाई महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख असलेले डॉ.राऊत हे विविध विषयांवरील दीड हजारांवर व्याख्यानांचे अनुभवसिद्ध व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. 9 पुस्तकांचे लेखन व 16 पुस्तकांचे संपादनासह हजारावर लेखांचे लेखन त्यांनी केले.

मी अशी घडले

गुरुवार, 27 मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे या ‘मी अशी घडले’ या विषयावर चौथे पुष्प गुंफणार आहेत. प्राथमिक शिक्षिका ते परीक्षा मंडळाच्या अध्यक्षा असा प्रवास त्यांनी केला आहे. शिक्षण पद्धतीला दिशा देण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. ग्रामीण कादंबरीतील स्त्री या पुस्तकासह स्पंदन मनाची हा काव्यसंग्रह व शोधताना स्वत:ला हा चारोळी संग्रह प्रकाशित आहे.

संगीत आणि आरोग्य

शुक्रवार, 28 मे रोजी निसर्गोपचार तज्ज्ञ व संगीत चिकित्सक म्हणून प्रसिद्ध डॉ.संतोष बोराडे हे ‘संगीत आणि आरोग्य’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफणार आहेत. आनंद, अध्यात्म आणि आरोग्याचा त्रिवेणी अभ्यास कलांच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांत पोहचविण्याचे कार्य ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. ‘जीवनसंगीत’ हा त्यांचा कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला आहे.

महाराष्ट्र आणि शिक्षण

शनिवारी, 29 मे रोजी शिक्षणक्षेत्राच्या अभ्यासक हेमांगी जोशी या ‘महाराष्ट्र आणि शिक्षण’ या विषयावर सहावे पुष्प गुंफणार आहेत. टाटा सामाजिक संस्थेतून उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर शिक्षणविकासासाठी त्यांनी काम केले. शिक्षण हक्क फोरम संस्थेच्या समन्वयक, उन्नती संस्थेच्या संस्थापक, स्थलांतरित बालकांच्या शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेणार्‍या कार्यकर्त्या म्हणून त्या परिचित असून शिक्षण प्रक्रियेच्या अभ्यासाठी देश-परदेशात दौरे केले आहेत.

दारिद्य्राची शोधयात्रा

रविवार, 30 मे रोजी लेखक व शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी हे ‘दारिद्य्राची शोधयात्रा’ या विषयावर सातवे पुष्प गुंफणार आहेत. शिक्षण विकासासाठी धाडसी विचारमांडणीसोबत तळागाळातील शिक्षण व्यवस्थेवरील अभ्यासमांडणीसाठी ते प्रसिद्ध आहेत. दारूबंदी आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळींच्या माध्यमातून समाज उन्नतीसाठी ते झटत असतात. नियोजन आयोगाच्या कार्यगटाचे ते माजी सदस्य आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com