दर्डे कोर्‍हाळे परिसरात बिबट्याची दहशत

पिंजरा लावण्याची मागणी
दर्डे कोर्‍हाळे परिसरात बिबट्याची दहशत

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील दर्डे कोर्‍हाळे परिसरातील चारी क्रमांक 8 माजी सरपंच साहेबराव शिंदे यांच्या वस्ती परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून येथील जनजीवन घबराटीचे झालेले आहे. कुत्रे, शेळ्या, कोंबड्या यावर रात्री अपरात्री बिबट्या ताव मारीत असल्याने घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे तेव्हा बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी अरुणराव येवले यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

माजी सरपंच साहेबराव शिंदे म्हणाले, माझे मर्यादित कुटुंब आहे, बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात वाढल्याने मनामध्ये भीती तयार झाली आहे. बिबट्यांना येथे नेहमीची येजा करण्याची सवय झाल्याने आम्हाला घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.

अरुणराव येवले म्हणाले, बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतातील कामे खोळंबलेली आहेत आहे, कष्टकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, शेतकरी, महिलांसह अबाल वृद्धांना तसेच शाळेत ये जा करणारे विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढली आहे. वन विभागाचे अधिकार्‍यांनी बिबट्याला मारता येत नाही, तसेच पकडण्यासाठी पिंजरे देखील लावण्याची परवानगी नाही असे सांगून हात वर केलेले आहे. त्यामुळे या परिसरात निर्माण झालेले बिबट्याचे संकट कसे दूर होणार हा कायमचा प्रश्न आहे. तेव्हा जिल्हाधिकार्‍यांनी या भागातील दैनंदिन जीवनमान अधिक सुरळीत कसे होईल हा प्रयत्न करावा व या बिबट्यापासून कायमची मुक्तता करावी, अशी मागणी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com