नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेवू- ना. विखे

नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेवू- ना. विखे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

तालुका स्तरावरील नायब तहसीलदार पद हे अतिशय महत्त्वाचे असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेऊन दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्यातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, अमोल निकम यांनी मागण्यांबाबतचे निवेदन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना सादर करून या मागण्यांबाबत तातडीने निर्णय करावा, अशी विनंती केली.

महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रीत वर्ग 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. परंतु या नायब तहसीलदारांच्या पदांचे वेतन हे राजपत्रीत दोन प्रमाणे नसल्याने ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून नायब तहसीलदार संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे या मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय करावा, अशी अपेक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी ना. विखे पाटील यांच्याशी चर्चे दरम्यान केली.

नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत यापुर्वीही चर्चा झाली आहे. यासंदर्भात शासन सकारात्मकच असून सर्वांना न्याय मिळेल अशीच भूमिका घेतली जाईल. यासंदर्भात दोनच दिवसांत आपण बैठक बोलावून या मागण्यांबाबत निर्णय होण्याच्यादृष्टीने योग्य ते निर्णय करू, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com