कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

कोपरगाव पालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी विजय कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून दीड लाख रुपयांची

रक्कम उकळली. तर माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आणि निखाडे यांनी वेगवेगळ्या ठेकेदाराकडून दमदाटी करून तर कधी बिले काढून देण्याच्या बदल्यात लाखो रुपये वसूल केल्याचा आरोप विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

यावेळी वहाडणे म्हणाले, कोपरगाव नगरपालिकेच्या कारभारावरून आपल्या समोर अनेक गैरव्यवहाराचे प्रकरणे समोर आली. आपण याची वाच्यताही केली मात्र समोरच्यांची बदनामी होऊ नये म्हणून नावे घेत नव्हतो. मात्र कोल्हे गटाचे आजी-माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष यांनी नावे घेऊन आरोप करण्याची मागणी वेळोवेळी केली. म्हणून आज त्यांच्या मागणीनुसारच आपण त्यांची नावे घेऊन पुराव्यानिशी आरोप करीत आहोत.

वहाडणे यांनी आपल्या आरोपांमध्ये भाजप, कोल्हे गट तसेच शिवसेनेच्या अनेक नगरसेवक, पदाधिकार्यांच्या गैरकृत्याची जंत्रीच पत्रकार परिषदेत मांडली. सर्व्हे क्र 210 च्या आरक्षण उठवण्यावरून नगरसेवक कैलास जाधव यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र 2011 साली कोल्हे गटाचे बबलू वाणी यांच्या 2.5 एकर क्षेत्रावरील आरक्षण काढताना हे झोपले होते काय? हेच कैलास जाधव त्यांचे साईबाबा नाक्यावरील सर्व्हिस स्टेशनचे अतिक्रमण काढू नये म्हणून माझ्याकडे येऊन माझे अतिक्रमण काढू नये म्हणून विनंती करीत होते. तर यांचेच सहकारी असलेले उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे मात्र खाजगीत येऊन कैलास जाधव यांचे अतिक्रमण काढण्याचा आग्रह धरत आहे.

विद्यमान उपनगरध्यक्ष निखाडे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या सोबतीने ठेकेदारांकडून हप्ते वसुली करतात. तसेच वाजे यांनी शुभम भावसार या ठेकेदाराच्या नावाखाली 10 लाखाच्या गटारीचे कामाचा ठेका स्वतः घेतला. त्याचे बिल अडकले असता खाजगीत येऊन माझ्याकडे बिल अदा करण्याची विनंती केली. आणि आपणही काम पूर्ण झाल्याची खात्री करून रक्कम अदा केली. आणि तेच आता उलट्या बोंबा मारत फिरत आहे. अशाच प्रकारे दुसरे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी 84 लाखांच्या गटारीचे काम त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर गोसावी यांना मिळावे म्हणून विनंती केली होती. मात्र टेंडर मध्ये हा ठेका न मिळाल्याने आता ते उर्वरित विकासकामांना विरोध करीत आहेत.

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांचे सहकारी पप्पू पाडियार यांच्या कायमच्या मागणीला कंटाळून सातभाई यांच्या जवळील अनेक ठेकेदार मित्र त्यांना सोडून गेले. विकास कामे नामंजूर केल्यामुळे कोल्हे गटाचेच असलेले नगरसेवक शिवाजी खांडेकर यांनी आपल्या दालनात येऊन त्यांच्याच गटाच्या पदाधिकार्यांना शिव्या घातल्या. त्यांची नाराजी काढण्यासाठीच मग त्यांना आरोग्य समितीचे सभापती करण्यात आले आहे. आपण पोलखोल केल्यामुळे कोल्हे गट माझ्यावर खोटे आरोप करून पलटवार करतील याची मला खात्री आहे. म्हणून आता केलेले आरोप केवळ हिमनगाचे टोक आहे. आपण पुढील 8 -10 दिवसांत पत्रकार परिषद घेऊन आणखी नावानिशी पोलखोलीचा दुसरा अंक सादर करणार आहोत, असेही वहाडणे म्हणाले.