उपायुक्तांनी ‘त्या’ ठेकेदाराला झापले

माळीवाड्यातील समस्यांची केली पाहणी । कामात दर्जा राखण्याच्या सूचना
उपायुक्तांनी ‘त्या’ ठेकेदाराला झापले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भुयारी गटारीचे काम करताना लेव्हलचा उडालेला बोजवारा, फुटलेली पिण्याची पाईप लाईन, तुटलेल्या वीज तारा

अशा तक्रारींमुळे उपायुक्त यशंवत डांगे थेट माळीवाड्यातील परिस्थितीची पाहणी करत ठेकेदाराची चांगलीच कानउघाडणी केली.

माळीवाडा परिसरातील जुना बाजार, पंचपीर चावडी, लोंढे गल्ली, आशा टॉकिज चौक आदी ठिकाणी भुयारी गटार योजनेंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांनी मनपा उपायुक्त यांच्याकडे केली होती.

याबाबत मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी संबंधित भागात फिरुन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. बोराटे यांनी निदर्शनास आणून दिलेल्या कामाची पाहणी करुन संबंधित ठेकेदारांना काम दर्जेदार करण्याच्या व कामाच्या दर्जाकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकार्‍यांना केल्या.

याबाबत बोराटे यांनी अधिकार्‍यांना सांगितले की, ज्यावेळी हे काम सुरु झाले त्यावेळी या भागातील खड्डे खोदल्याने पिण्याच्या पाईपलाईन फुटल्या, वीज वितरणाच्या वायरही तुटल्या होत्या, तसेच भुयारी गटारीचे लेव्हर योग्य नव्हती. याबाबत आपण मनपाच्या संबंधितांकडे तक्रार केली. त्यामुळे आज उपायुक्तांनी पाहणी केली. अधिकार्‍यांनी संबंधितांना सूचना देऊन दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे हे काम चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com