लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी मिळालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावीत

उपमुख्यमंत्री अजित पवार || राज्य सरकारकडून सर्व समाज घटकांचा विचार
लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी मिळालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावीत

जामखेड |प्रतिनिधी)| Jamkhed

सर्व समाज घटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. करोना व इतर अनेक नैसर्गिक संकटात ही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे केली पाहिजेत. अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

जामखेड शहर व तालुक्यातील विविध विकासकामांचा एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, आ. रोहीत पवार, आ. लहू कानडे, आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, राज्यात केंद्र व राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत. आमदार निधी 4 कोटी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन मंडळांना शंभर टक्के निधी देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत, करोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्याने काम केले. शेतकर्‍यांना 3 लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

जनतेने ही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे. थकीत वीज बीले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. पवार पुढे म्हणाले, ऊसाला जास्तीत भाव मिळावा यासाठी शासन साखर कारखानादारांशी चर्चा करत आहे. शेती उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाठी मार्केट कमिट्या मजबूत झाल्या पाहिजेत. एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र प्रवाशी हिताचा पण विचार झाला पाहिजे. असे ही श्री.पवार यांनी सांगितले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले, करोना संकटात राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आले आहे.

रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात आला. हे उल्लेखनीय आहे. यावेळी जामखेड येथे करोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. रवी व शोभा आरोळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

विखेंकडे बोट

जिल्हा बँकेत कर्ज वाटपात कर्जत-जामखेड तालुक्यावर दुजाभाव केला जात असून याकडे आपल्याला पाहावे लागेल, असे बोलत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना लक्ष केले. उदय शेळके तसेच इतर ज्येष्ठ संचालकांना याबाबत आपण विचारणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com