जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लंगोरे यांची टाकळीभानला भेट

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लंगोरे यांची टाकळीभानला भेट

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

टाकळीभान ग्रामपंचायतची घरकुल योजना जागेआभावी रखडल्याने घरकुलाचे उदिष्ट पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेकडुन भूमीशोध अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत जि. प. चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लंगोरे यांनी टाकळीभान ग्रामपंचायतीला भेट देवुन ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी श्रीरामपूरचे गटविकास आधिकारी मच्छिंद्रनाथ धस, विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग, श्री. चर्‍हाटे, प्रभारी ग्रामविकास अधिकारी श्री. ढुमणे उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडुन घरकुल योजनेतील जागेच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन प्रलंबीत ब व ड घरकुल यादीची माहिती देण्यात आली. ब घरकुल लाभार्थी पात्र संख्या 403 असून ब घरकुल लाभार्थी पात्र यादीतील पूर्ण झालेली घरकुल संख्या 59 आहे. 21 लाभार्थ्यांची घरकुले विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत. 6 घरकुलांची कामे सुरु आहेत. 8 लाभार्थ्यांचे नव्याने पात्र यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहे. या यादीतील पात्र 170 लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही किंवा ग्रामपंचायत दप्तरी अतिक्रमीत म्हणूनही नोंद नाही.

या यादीतीलच पात्र 139 लाभार्थ्यांकडे आतिक्रमित जागा असून आतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. तर ड घरकुल लाभार्थी पात्र संख्या 242 आहे. या घरकुल पात्र यादीतील 18 लाभार्थी सद्य स्थितीत वनविभागांच्या जागेत राहत असून पात्र यादीतील 140 लाभार्थी हे सद्य स्थितीत सरकारी जागेत राहतात. तर 63 लाभार्थी खाजगी जागेत राहतात मात्र सदर जागा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे आहे. याच यादीतील 21 लाभार्थी हे स्व: मालकीच्या व स्वत:च्या नावे उतारा असणार्‍या जागेत राहतात, अशी माहीती यावेळी देण्यात आली.

ब व ड घरकुल पात्र यादीमध्ये आदिवासी व मागसवर्गीय लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पात्र लाभार्थ्याकडे स्वत:कडे किंवा कूंटुबात वर्ग 2 ची जमिन असून घरकुलासांठी 1 गुठ्यांचा विकसन करार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. यावर विकसन करार करणार्‍या 10 ते 20 घरकुल पात्र लाभाथ्यार्ंचे एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे ठरले. ब व ड यादीतील पात्र लाभार्थ्याला कुंटूबातील अथवा विक्री करुन घरकुलासाठी 1 गुंठा जागा खरेदी करावयाची असेल तर घरकुलकामी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी मान्य केले आहे. ब व ड घरकुल यादीतील पात्र लाभार्थ्यासाठी ग्रामपंचायतीने अर्धा गुंठा प्रती लाभार्थी याप्रमाणे जास्तीतजास्त जेवढी शक्य होईल तेवढी खाजगी जागा खरेदी करावी, जागा खरेदीची रक्कम महिन्याभरात देऊ, असे आश्वासन यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लंगोरे यांनी दिले.

अतिक्रमण नियामानुकूल प्रस्तावातील जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायत व खाजगी जमिनीची पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, ग्रा. प. सदस्य मयुर पटारे, सुनिल त्रिभुवन, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे, विलास दाभाडे, विलास सपकळ उपस्थित होते.

घरकुल हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून शासनाच्या जाचक अटीमुळे सर्वांना न्याय देता येत नाही. ड घरकुल यादीत काही प्रमाणात लाभार्थी संख्या वाढू शकते पण ते प्रमाण नगन्य असेल दुचाकी, तीन व चार चाकी वाहन नावावर असल्यास, कुटुंबात अडीच एकर क्षेत्र बागायत, पाच एकर क्षेत्र कोरवाहू असल्यास, 50 हजार रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड असल्यास, राहते घर पक्के बांधकामाचे असल्यास, या प्रमुख अटीमुळे अपात्र होण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या कुंटुबाला घरकुलाचा लाभ मिळून 30 वर्षे झाली आहेत त्यांनाही घरकुलाचा लाभ देता येईल. पुढील काळात घरकुल कामांना वेग मिळेल, असे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com