
लोणी |प्रतिनिधी| Loni
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून 8 लाख शेतकर्यांची माहिती अपडेट झालेली नाही. महसूल आणि कृषी विभागाच्या श्रेयवादात शेतकर्यांचे मरण का करता? असा प्रश्न आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील चर्चेत सहभाग घेताना आ. विखे पाटील यांनी केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी सुरू केलेल्या योजनेचा लाभ मिळण्यापासून राज्यातील 8 लाख शेतकरी वंचित राहत आहेत. केवळ शेतकर्यांची माहिती शासकीय व्यवस्थेकडून अपडेट होत नसल्याची बाब आ. विखे पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
राज्यात या योजनेचे प्रभावी काम झाल्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळाला. परंतु पूर्वी बाह्य यंत्रणेकडून केलेले काम व चुकीच्या झालेल्या नोंदी या योजनेच्या मुळावर उठल्या आहेत. परंतु महसूल आणि कृषी विभागातील श्रेयवादात शेतकर्यांचे मरण का करता असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला. शेतकर्यांची माहिती अपडेट होण्यास विलंब होत असल्याने सरकारकडून किती दिवसांत ही माहिती अपडेट होईल आणि शेतकर्याची माहिती अपडेट करण्यास विलंब करणार्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वयातून 25 तारखेपासून स्वतंत्र मोहीम राबवून शेतकर्यांची माहिती अपडेट करण्याचे आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.