सार्वजनिक बांधकाम विभागाने बाभळेश्वर-नेवासा महामार्गावर एक हजार झाडे लावावीत

सार्वजनिक बांधकाम विभागाने बाभळेश्वर-नेवासा महामार्गावर एक हजार झाडे लावावीत

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर-नेवासा महामार्ग रुंदीकरणाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड सुरू आहे. पुढील काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने सामाजिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा किमान एक हजार झाडे लावावीत, अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे.

श्रीरामपूर-नेवासा महामार्गावर प्रवास करणार्‍या नागरिकांसाठी इंग्रजांच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वटवृक्षासह चिंच, आंबा, लिंब यांची झाडे लावली होती. सध्या बाभळेश्वर-नेवासा रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यभागापासून किती अंतर रुंदीकरण करणार आहे, तेवढेच वृक्ष किंवा त्यांच्या फांद्या तोडल्या पाहिजे होत्या. परंतु मोठमोठे वृक्ष जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी खरोखर रस्त्याच्या मध्यभागी झाडे येत होती, ती तशीच ठेवून कडेची झाडे तोडताना सार्वजनिक बांधकाम विभाग धन्यता मानत आहे. परंतु तोडलेली झाडे आता पुन्हा उगवण्यासाठी अनेक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. अनेक दशकानंतर या रस्त्यावर आता सावली राहणार नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या महामार्गावर किमान एक हजार झाडे लावावीत. कारण आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसईबीच्या लोकांनी फक्त झाडे तोडण्यात स्वारस्य दाखविले आहे. परंतु झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला नाही. यापुढे सामाजिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना हाताशी धरून पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, कल्याण निळे, राजू त्रिभुवन, आनंद रणदिवे, प्रदीप शेळके, किरण अमोलिक, भारत त्रिभुवन, संजय बोरगे, नयन शिरसागर आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com