आरोग्य खात्याच्या कायाकल्प पुरस्कारांत नगर राज्यात नंबर वन

सर्वाधिक 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरस्कार || ब्राम्हणवाडा, चास जिल्ह्यात प्रथम
आरोग्य खात्याच्या कायाकल्प पुरस्कारांत नगर राज्यात नंबर वन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्य ठेवावे यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. यात नगर जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाले आहेत, तर जिल्ह्यात ब्राम्हणवाडा व चास ही प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम ठरली आहेत.

2 ऑक्टोबर 2014 पासून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्य ठेवावे, यासाठी कायाकल्प पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजना आधारावर पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये निर्धारित मानक पूर्ण करणार्‍या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात.

सन 2021-22 साठी नगर जिल्ह्यातील 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मूल्यांकन हे राज्य स्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे तयार चेकलिस्टप्रमाणे करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 463 प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला. यामध्ये नगर जिल्ह्यातील सर्वाधिक 46 प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी जिल्हास्तरीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. लवकरच संबंधित संस्थांना जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरित करण्यात येतील.

75 टक्के रक्कम संस्था बळकटीकरणासाठी

प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आलेल्या रकमेतील 75 टक्के रक्कम आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी व 25 टक्के रकमेचा विनियोग अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी संस्था अंतर्गत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात येणार आहे.

44 केंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र व नगर तालुक्यातील चास प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी संयुक्तपणे जिल्हांतर्गत प्रथम पुरस्कार मिळविला आहे. प्रत्येकी एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे त्यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय इतर 44 प्राथमिक आरोग्य केंद्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनासुद्धा प्रोत्साहनपर पुरस्कार घोषित झाले आहेत. त्यांच्या पुरस्कारचे स्वरूप प्रती प्राथमिक आरोग्य केंद्र 50 हजार असे आहे. असे एकूण 46 प्रा. आरोग्य केंद्र कायाकल्प पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत.

या प्राथमिक आरोग्य केंद्रांना

नगर तालुका- चास, रूईछत्तीशी, वाळकी, टाकळी काझी, टाकळी खातगाव, मेहकरी. पारनेर- कान्हूर पठार, खडकवाडी, निघोज, रूईछत्रपती, अळकुटी, पळवे खु. राहुरी-उंबरे, टाकळीमिया, गुहा, मांजरी. संगमनेर- बोटा, चंदनापुरी, गुहा, मांजरी. श्रीगोंदा- लोणी व्यंकनाथ, आढळगाव, बेलवंडी, कोळगाव. श्रीरामपूर- बेलापूर खु. माळवडगाव, टाकळीभान, निमगाव खैरी. अकोले- ब्राह्मणवाडा, विठा, म्हाळादेवी. नेवासा-उस्थळ दुमाला, चांदा, नेवासा खु. पाथर्डी- खरवंडी कासार, तिसगाव, माणिकदौंडी.राहाता-कोल्हार बु., दाढ बु., सावळीविहीर. कर्जत- कुळधरण, बारडगाव सुद्रिक. शेवगाव-हातगाव नगर, दहिगावने. जामखेड- अरणगाव. कोपरगाव- दहिगाव बोलका.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com