
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने 11 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी केले आहे. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया 61 दिवसांत पूर्ण करण्यात येऊन योजनेतील अंतिम लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धनच्या या योजनेत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्यासाठी स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
या योजनेत 13 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यान अर्ज करता येणार आहे. यासाठी 30 दिवसांचा कालवधी आहे. 12 आणि 13 जानेवारीला दोन दिवसांत डाटा बॅकअप करण्यात येणा असून 14 ते 18 जानेवारी या पाच दिवसांत रॅडमायझेशन पध्दतीने लाभार्थी यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. 19 जानेवारी राखीव दिवस असून 20 ते 27 जानेवारीदरम्यान मागील वर्षी, तसेच या वर्षीच्या लाभार्थी यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी राहणार आहे. 28 जानेवारी हा दिवस राखीव असून 29 जानेवारी ते 5 फेब्रवारी दरम्यान पशूधन विकास अधिकारी, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, उपायुक्त यांच्या मार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करण्यात येणार आहे.
6 फेब्रवारी हा दिवस राखीव असून 7 आणि 8 फेब्रवारीला लाभार्थ्यांना कागदपत्रातील त्रुटी दूर करता येणार आहेत. 9 फेबु्रवारीला कागदपत्रांची अंतिम पडताळणी करण्यात येणार असून 10 फेब्रवारी राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. 11 फेबु्रवारीला अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 61 दिवसांत पूशसंवर्धनच्या योजनांचे लाभार्थी अंतिम करण्यात येणार आहेत.