पशूसंवर्धन विभाग टाकणार कात !

ना. विखे यांचा पुढाकार || विभाग होणार आधुनिक
पशूसंवर्धन विभाग टाकणार कात !

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

राज्यातील पशूसंवर्धन विभाग अद्ययावत होणार आहे. पशूसंवर्धन विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा तालुका पातळीवर आधूनिक प्रयोग शाळा, एक्सरे आणि सोनोग्राफी मशीन, बायो केमिकल आणि हेमेटोलॉजी एनालायझर यासह पशूधनावर उपचार करण्यासाठी अन्य उपकरणे उपलब्ध करण्यात येणार आहे.

याबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. राज्याचे महसूल तथा दुग्धविकास आणि पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासाठी आग्रही आहेत. आता विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पशूसंवर्धन विभागाच्या पुर्नबांधणीला सुरूवात होणार आहे.

कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत सार्वजनिक आणि खासगी आरोग्य सेवेच्या मर्यादा समोर आल्या. त्याप्रमाणे जनावरांच्या लम्पी आजारानंतर पशूधनावरील उपचाराच्या मर्यादा लक्षात आल्या. भविष्यात लम्पीप्रमाणे जनावरांमधील साथजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी पशूसंवर्धन विभागाने कात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर जनावरांच्या आजारांचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहेत.

यात जनावरांच्या रक्तांची, शेणाची देखील तपासणी करण्यात येणार असून जनावरांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी अँटीबॅटीक सेन्सिटिव्हीटी टेस्ट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसे जनांवरासाठी बायो केमिकल आणि हेमेटोलॉजी एनालायझर यासह उच्च प्रतिचा मायक्रोस्कोप, हाय रेज्यूलेशन एक्सरे आणि सोनोग्राफी मशीन, कंत्राटी प्रयोग शाळा तंत्रज्ञ यांची नेमणूक करून तालुका पातळीवर जनावरांच्या आजारांचे निदान करून त्यांना तात्काळ उपचार करण्याचा प्रयत्न आहे.

यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची मागणी करण्यात आलेली आहे. पदवीधर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे. जनावरांमध्ये लम्पी चर्म रोगाचया प्रार्दुभावानंतर आता नगरसह राज्यातील पशूसंवर्धन विभाग आपल्या कामकाजात आणि उपचारात अमुलाग्रह बदल करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पशूसंवर्धन मंत्री विखे यांचा पुढाकार असून त्याचा फायदा राज्यतील शेतकरी आणि पूशधनला होणार आहे.

इलेक्ट्रीक अ‍ॅम्बुलन्स

जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यापूर्ण योजनेतून 14 तालुक्यांना पशूधनावर उपचार करण्यासाठी अद्यावत सर्व सुविधा आणि उपचारांची साधणे असणारी इलेक्ट्रीक अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे पशूधनावर तातडीने उपचार करणे सहज शक्य होणार आहे.

प्रयोग शाळेसाठी 1 कोटी 38 लाखांची मागणी

जिल्ह्यातील 14 तालुक्यात पशूधनावर उपचार करण्यासाठी पशूसंवर्धन विभाग जिल्हा नियोजन समितीकडे अद्यावत प्रयोग शाळा, त्यातील उपकरणे, अ‍ॅटीबायोटीक सेन्सिटीव्हीटी टेस्ट सुविधांसह, उच्च प्रतिचा मायक्रोस्कोप, हाय रेज्यूलेशन एक्सरे आणि सोनोग्राफी मशीन यासाठी 1 कोटी 38 लाख रुपयांची मागणी करणार आहे. या निधीतून तालुका पातळीवर कंत्राटी प्रयोग शाळा तंत्रज्ञ यांची नेमणूक करून जनावरांच्या आजारांचे तात्काळ कमी खर्चात निदान करून उपचार करणार आहे.

फिरत्या पशूवैद्यकी दवाखान्यांना मिळाले डॉक्टर

जिल्ह्यात पाच पशूवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. मात्र, याठिकाणी नेहमी प्रभारी जनावरांच्या डॉक्टरांची नेमणूक करण्यात येत असत. मात्र, लम्पी प्रकोपादरम्यान पशूसंवर्धन मंत्री विखे पाटील यांच्या पुढकारातून या पाच फिरत्या दवाखान्यांना सेवानिवृत्त पशूधन विकास अधिकारी अथवा उपायुक्त यांची कंत्राटी पध्दतीने नेमणूक झाल्याने याठिकाणी पर्णवेळ पशूवैद्यक उपलब्ध झाले.

Title Name

नगरची स्थिती

जिल्ह्यात पशूसंवर्धनचे 216 दवाखाने असून यात श्रेणी 1 चे 78, श्रेणी 2 चे 138 आहेत. झेडपी पशूसंवर्धन विभागाच्या लोणी आणि श्रीगोंदा या प्रत्येकी एक प्रयोग शाळा आहे. काष्टी, वडाळा, नेवासा आणि लोणी याठिकाणी प्रत्येकी एक सोनोग्राफी मशीन सेंटर आहे. यासह 42 कंत्राटी पशूधन पर्यवेक्षक असून शासकीय वर्ग 1 चे 87 पशूधन विकास अधिकारी असून वर्ग 3 चे 39 सहायक पशूधन विकास अधिकारी आहेत. यासह 118 पशूधनपर्यवेक्षक असून 59 वर्णोपचारक (ड्रेसर) कार्यरत आहे.

राज्य सरकारच्या पशूसंवर्धन विभाग (उपायुक्त पशूसंवर्धन विभाग) यांनी 3 कोटी 15 लाख रुपयांची मागणी यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीकडे केलेली असून यातून त्यांच्याकडील सध्या सुरू असणार्‍या सात प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी, तसेच काही ठिकाणी नव्याने उपकरणे घेण्यासाठी, काही ठिकाणी जुनी उपकरणे दुरूस्ती करण्यात येणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com